Success Story: अभ्यास करण्याच्या वेळी घरी पाहुण्यांचे आगमन, बाहेर गाण्यांद्वारे ध्वनिप्रदूषणाचा त्रास, मोबाईलमुळे दुर्लक्ष होणं, कितीही वेळा वाचूनही पाठांतर होत नाही, अशी अभ्यास न करण्याची अनेक कारणं काही विद्यार्थ्यांकडे तयार असतात. पण, वेळ, परिस्थिती कशीही असली तरी जिद्द व चिकाटी असेल, तर आपण प्रत्येक समस्येवर मात करून, स्वतःचा अनोखा मार्ग शोधून काढू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील राहणाऱ्या अभिषेक सुजित शर्मा याची गोष्टसुद्धा अशीच आहे. अभिषेक शर्मा मुंबईत लोकमान्य टिळक नगरच्या चाळीत राहतो. लहानपणापासूनच अभिषेकने वैज्ञानिक बनण्याचे स्वप्न पाहिले होते. या प्रवासात अभिषेकला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अनेक अडचणी असूनही अभिषेकने आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले.

अभिषेकचे वडील एका स्टील फॅब्रिकेशन कंपनीत मजूर आहेत. ते महिन्याला तीन हजार रुपये कमावतात. त्यांचे चार जणांचे कुटुंब चाळीमधील एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहते. या परिसरातील रहिवासी अनेक गुन्हेगारांमुळे त्रस्त होते. त्याशिवाय येथे खासगी शौचालयासारख्या मूलभूत सुविधादेखील नव्हत्या. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातूनही खूप आवाज, तसेच अभ्यासात सतत काही ना काही व्यत्यय यायचे. मोबाईल डेटा संपला की, तो शेजारच्या वाय-फाय कनेक्शनचा वापर करून माळ्यावर अभ्यास करायचा. अशा अनेक समस्यांचा त्रास असूनही तो चिकाटीने अभ्यास करीत होता. कारण- अभिषेकला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच स्वतःच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेरही काढायचे होते.

हेही वाचा…IBPS SO Recruitment: सरकारी बँकेत काम करायचं आहे? आयबीपीएस अंतर्गत ‘या’ विविध पदांवर भरती सुरू; आजच करा अर्ज

आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण :

अखेर सर्व समस्यांवर मात करून त्याने आपले स्वप्न सत्यात उतरवले. जेईई ॲडव्हान्सचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभिषेकच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. परीक्षेच्या निकालात त्याला वरची रँक मिळाल्यामुळे त्याला आयआयटी दिल्लीमध्ये स्थान मिळाले. त्याच्या कुटुंबाच्या अतुलनीय पाठिंब्याने प्रेरित होऊन, तो नकारात्मक प्रभावांपासून दूर राहिला आणि त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. परीक्षेच्या तयारीदरम्यान कुटुंब ही माझी सर्वांत मोठी सपोर्ट सिस्टीम आहे, असेही तो म्हणाला होता. कारण- चाळीतील छोट्याशा घरात राहून, त्याच्या पालकांनी त्याला अभ्यासासाठी जागा मिळावी यासाठी आरामाचा त्याग केला होता.

‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांनी एका व्हिडीओमधू अभिषेकची ही कहाणी शेअर केली आहे. पांडे आयआयटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या घरी गेले होती. त्यानिमित्त विद्यार्थ्यांच्या आईने अलख पांडे यांच्यासाठी खास पुरी-भाजी बनवली होती. घरात बेडवर बसून अलख पांडे विद्यार्थ्याबरोबर पुरी-भाजी खाताना आणि त्याच्या आईशी संवाद साधताना दिसत आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

‘फिजिक्सवालाच्या परवडणाऱ्या ऑनलाइन कोर्सेसच्या शिष्यवृत्तीने माझा प्रवास बदलला आणि जेईईसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवून दिले, असे त्याने म्हटले आहे. कितीही आव्हाने समोर आली तरीही स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा असा सल्ला अभिषेक सर्वांना देतो; जो सध्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of abhishek sujit sharma student who cracked iit entrance exam who lived in slums with many problems asp