२०२४ मध्ये टेलिकॉम कंपनी एअरटेलचे मार्केट कॅप चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढले. हुरुनच्या २०२४ बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५०० नुसार, या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक वाढ झाली. आज कंपनीचे मार्केट कॅप ९,२६,४३३.३१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि ती भारतातील चौथी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि टाटा ग्रुपची टीसीएस फक्त या कंपन्या एअरटेल कंपनीच्या पुढे आहेत. एअरटेलला त्याच्या प्रवासात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण प्रत्येक वेळी ही कंपनी विजयी झाली. चला तर मग यानिमित्ताने कंपनीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या…

सुनील भारती मित्तल यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९५७ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. त्यांचे वडील सतपाल मित्तल हे दोन वेळा खासदार होते, पण वडिलांप्रमाणे राजकारणात येण्याऐवजी सुनील यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण मसुरीतील बिनबर्ग स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असूनही त्यांनी यशाचे खरे धडे रस्त्यावरून शिकले. सुनील यांनी त्यांच्या वडिलांकडून २०,००० रुपये घेतले आणि त्याच्या मित्रासोबत सायकलचा व्यवसाय सुरू केला.

व्यवसायामध्ये आली अडचण

त्यांनी सायकलचे सुटे भाग बनवण्यासाठी एक युनिट स्थापन केले. फक्त तीन वर्षांत त्यांनी एका युनिटपासून तीन युनिट्स बनवले होते. या व्यवसायात त्यांना नफाही झाला, पण सुनील यांना त्यात फारशी क्षमता दिसली नाही. सुनील यांनी त्यांचा सायकलचा व्यवसाय विकला आणि ते इलेक्ट्रिक पॉवर जनरेटर म्हणून काम करू लागले. १९८३ मध्ये सरकारने जनरेटरच्या निर्यातीवर बंदी घातली, यामुळे सुनील यांच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी एक बीटल नावाचा फोन आणला. हा फोन ते तैवानमधून आयात करायचे.

अखेर १९९२ मध्ये त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आला. सरकार पहिल्यांदाच मोबाइल फोन सेवांसाठी परवाने देत होते. त्यावेळी सुनील मित्तल यांनी सेल्युलर सर्कलचा परवानाही मिळवला. यानंतर १९९५ मध्ये सुनीलने भारती सेल्युलर लिमिटेड (BCL) ची स्थापना केली. यामध्ये त्यांनी एअरटेल ब्रँड आणला. २००८ पर्यंत एअरटेलच्या ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. यासह एअरटेल जगातील सर्वोत्तम टेलिकॉम कंपन्यांपैकी एक बनली.

जिओचे आव्हान

पण २०१६ मध्ये भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात भव्य प्रवेश केला. कंपनी मोफत व्हॉइस आणि डेटा सर्विसेस देत होती, यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या; तर दुसऱ्या बाजूला वोडाफोन आणि आयडियाने हातमिळवणी केली. एअरटेलचा नफाही लक्षणीयरीत्या घसरला होता आणि ग्राहकांची संख्याही कमी होत होती. पण, एअरटेलने काळाबरोबर स्वतःला बदलले आणि आज ही कंपनी मजबूतपणे उभी आहे.

२२.५ अब्ज रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सुनील मित्तल यांचं नाव समाविष्ट आहे. भारती एअरटेलमध्ये त्यांचा २५ टक्के हिस्सा आहे. भारती एंटरप्रायझेस आणि इतर होल्डिंग कंपन्यांमध्येही त्यांचे शेअर्स आहेत. भारती एअरटेलचा व्यवसाय १७ देशांमध्ये पसरलेला आहे आणि त्याचे ४९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. मित्तल यांचा ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टमध्ये (Brookfield India Real Estate Trust) ५०% हिस्सा आहे.

Story img Loader