Success story of Ankurjeet Singh: ज्या वयात मुलं आपल्या उज्ज्वल भविष्याची तयारी करत होते, सभोवतालचं सुंदर जग पाहायला शिकत होते, त्या वयात अंकुरजीत सिंग यांचं आयुष्य हळूहळू अंधारात सरकत होतं. लहान वयातच त्यांची दृष्टी हळूहळू कमी झाली आणि त्यांना दिसणं बंद झालं. परंतु, या कठीण काळात त्यांनी हार मानली नाही. या अंधारातदेखील त्यांनी उजेड शोधला. अथक परिश्रम, मेहनत घेऊन आपल्या जिद्दीवर त्यांनी यश प्राप्त केलं. आपली भीती आणि सगळी दु:ख मागे सारून दृढनिश्चय करून अंकुरजीत सिंग यांनी देशातील सर्वात प्रतिष्ठित पदांपैकी एक असलेलं आयएएस अधिकाऱ्याचं पद मिळवलं. त्यांचीच प्रेरणादायी कथा आज आपण जाणून घेणार आहोत.

हरियाणातील यमुनानगर येथे जन्मलेले अंकुरजीत सिंग लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. तथापि, बालपणात त्यांची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागल्याने त्यांचे जीवन बदलले. ते शाळेत असताना त्यांना फळ्यावर लिहिलेले वाचणेही कठीण झाले होते आणि त्यानंतर त्या तरुण मुलाची दृष्टी गेली. इतकं सगळं होऊनही, त्यांची ज्ञानाची तहान कमी झाली नाही.

हेही वाचा… लहानपणीच केलं अ‍ॅप लॉंच अन् वयाच्या १३व्या वर्षी झाला कंपनीचा मालक; वाचा आदित्यन राजेशचा उल्लेखनीय प्रवास

एक विद्यार्थी म्हणून अंकुरजीत हे नेहमीच जास्त मेहनत घेत असत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इतर मुलं खेळत असताना ते त्यांच्या आईच्या मदतीने शालेय पाठ्यपुस्तके पूर्ण करत असत. केवळ आईचं बोलणं ऐकून त्यांना वर्गातील लेक्चर्स समजतील याची खात्री ते करून घेत असत.

बारावीत असताना एका शिक्षकाने प्रोत्साहन दिल्यानंतर अंकुरजीत यांनी एक धाडसी पाऊल उचललं आणि IIT साठी अर्ज केला. दृष्टीदोष असूनही त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयटी रुरकी येथे जागा मिळविली. UPSC ची तयारी करणाऱ्या मित्रांना पाहिल्यावर अंकुरजीत यांनी स्वत:लाच एक नवीन आव्हान दिलं. स्क्रीन रीडर आणि तांत्रिक साहाय्यांचा वापर करून, रात्र-रात्र उशिरापर्यंत जागून त्यांनी UPSC चा अभ्यास केला.

हेही वाचा… बिहारमधील लहानशा गावात राहणाऱ्या तरुणाला मिळाली गुगलमध्ये नोकरी अन् २ कोटींचं पॅकेज; वाचा अभिषेक कुमारचा प्रेरणादायी प्रवास

२०१७ मध्ये अंकुरजीत यांच्या कठोर परिश्रमाला फळ मिळालं, जेव्हा त्यांनी UPSC परीक्षेत ४१४ वा क्रमांक मिळवला आणि हा पराक्रम साध्य करणाऱ्या काही दृष्टिहीन अधिकाऱ्यांपैकी ते एक बनले.

नुकतीच अंकुरजीत सिंग यांची जालंधर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते तिथेच थांबले नाहीत; तर पंजाब सरकारने अलीकडेच जालंधर विकास प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकाच्या प्रतिष्ठित पदावर त्यांची बदली केली. आपल्या उल्लेखनीय प्रवासातून अंकुरजीत इतरांना प्रेरणा देत हे सिद्ध करत आहेत की, दृष्टी गमावणे हे दृढनिश्चयाच्या पाठिशी असलेल्या दृष्टीशी जुळत नाही.