Success Story of Bala Sarda: IBEF च्या अहवालानुसार चहा उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. खरे तर पाण्यानंतर चहा हे जगभरात सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय आहे. भौगोलिक आणि हवामानानुसार, भारत चहाच्या लागवडीसाठी योग्य आहे आणि ईशान्य प्रदेश, उत्तर बंगाल व दक्षिण भारतात सर्वाधिक चहाचे उत्पादन होते.
गेल्या काही वर्षांत भारताच्या दार्जिलिंग चहाने जागतिक बाजारपेठेत स्वतःचे नाव कमावले आहे. यूके ब्रॅण्ड ट्विनिंग्स टी आणि स्टारबक्सची उपकंपनी तेवाना ही भारतीय चहाच्या चवीची बढाई मारून, त्यांच्या ग्राहकांना याची विक्री करीत आहेत.
पण, भारतीय चहाला मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी भारताचे उद्योजक बाला सारदा यांना असे वाटते की, ब्रॅण्ड म्हणून भारताला परकीय बाजारपेठांमध्ये कार्यक्षमतेने स्थान दिले जात नाही.
बाला सारदा यांच्यानुसार, “असे काही विदेशी ब्रॅण्ड आहेत, जे भारतातून चहा मागवितात. कारण- परदेशातील ग्राहकांना त्याची चव आवडते. तरीही मला तेथे विक्री पॉईंट म्हणून ‘मेड इन इंडिया’ असा टॅग कुठेही आढळला नाही. कारण- अशी धारणा आहे की, भारतीय ब्रॅण्ड जर तेच उत्पादन विकत असेल, तर ते दर्जेदार नसेल.”
बाला सारदा (Who is Bala Sarda)
चहा निर्यातदारांच्या कुटुंबातून आलेले बाला सारदा हे चहा उद्योगाची पुरेशी माहिती असलेल्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले.
महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर बाला यांनी दार्जिलिंगमधील त्यांच्या कौटुंबिक चहाच्या मळ्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना भारतीय चहाची प्रचंड क्षमता आणि जागतिक चहा उद्योगात ते किती मूल्य निर्माण करू शकते याची जाणीव झाली.
‘वाहदम टी’ची स्थापना (Establishment of Vahdam Teas)
२०१५ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी बाला यांनी नवी दिल्ली येथे ‘वाहदम टी’ची (Vahdam Teas) स्थापना केली. एक डिजिटली नेटिव्ह, व्हर्टिकल इंटिग्रेटेड ग्लोबल वेलनेस ब्रॅण्ड- जो भारतातील सर्वोत्तम चहा जगभरात पोहोचवतो. या कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.
USDA प्रमाणपत्र आणि नॉन-GMO पडताळणी उत्तीर्ण झाल्यानंतर बाला यांनी यूएस मार्केटमध्ये Vahdam Teas लाँच केली. नंतर त्यांनी कॅनडा, यूके व जर्मनी हे देश संभाव्य बाजारपेठ म्हणून शोधले.
“परदेशात स्वदेशी ब्रॅण्ड लाँच करून भारतीय चहाचा प्रचार करण्यासाठी अनेक ब्रॅण्ड पुढाकार घेत नाहीत. तुम्हाला Starbucks टर्मरिक लाटे सादर करताना दिसत आहे. पाश्चिमात्य लोकच आमच्या स्वदेशी उत्पादनांच्या फायद्यांचा प्रचार करीत आहेत; मग आम्ही का करू नये? मला या संधीचा फायदा घ्यायचा होता आणि याचे मूल्यदेखील टिकवून ठेवायचे होतं”, असं बाला म्हणाले.
‘वाहदम’ आता यूएसमध्ये एक हजारपेक्षा जास्त किराणा दुकानांमध्ये उपलब्ध आहे. नॉर्डस्ट्रॉम, नीमन मार्कस, ब्लूमिंगडेल्स, बर्गडॉर्फ गुडमन व सॅक्स फिफ्थ अव्हेन्यू यांसह यूएसमधील प्रीमियम व लेगसी रिटेल चेनमध्ये लिस्ट केलेल्या पहिल्या काही भारतीय ब्रॅण्डपैकी हा एक ब्रॅण्ड आहे.
सध्या ‘वाहदम’कडे सुमारे 175 SKU आहेत, ज्यात पिरॅमिड-टी बॅग, सुपरफूड, गिफ्ट सेट, टीवेअर व ड्रिंकवेअर यांचा समावेश आहे.
सुरुवातीला कंपनीने ब्लॅक टी, ग्रीन टी, ओलोंग टी, व्हाईट टी इत्यादींसह लूज-लीफ टीसह सुरुवात केली. सध्या, पिरॅमिड-टी बॅग्ज, सुपरफूड्स, गिफ्ट सेट, टीवेअर, ड्रिंकवेअर यासह त्यांच्याकडे सुमारे 175 SKU आहेत.
आर्थिक वर्ष २०२० नुसार कंपनीने सरासरी १४५ कोटी रुपयांची कमाई केली. बाला सांगतात की, ‘वाहदम’चे जवळपास १.५ दशलक्ष यूएस ग्राहक आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd