Success story of Bhavin Parikh: भाविन पारेख यांनी वडिलांच्या छोट्या शर्टच्या दुकानाचे रूपांतर करोडो रुपयांच्या कापड कंपनीत केले आहे. २०११ मध्ये वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी भाविन यांनी अहमदाबादमध्ये ग्लोब टेक्स्टाइलची स्थापना केली. त्यांनी वडिलांच्या रिटेल व्यवसायाचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. ही कंपनी यावर्षी ४३१ कोटी रुपयांची होईल, असा अंदाज आहे. चला, भाविन पारेख यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ…
२०११ मध्ये रचला कंपनीचा पाया
भाविन जेव्हा त्यांच्या वडिलांच्या शर्टच्या व्यवसायात सामील झाले तेव्हा खूप गोष्टी मर्यादित होत्या. भाविनने २०११ मध्ये १० लाख रुपयांच्या गुंतवणुकीने ‘ग्लोब टेक्स्टाइल’ची स्थापना केली. त्यांनी अहमदाबादच्या खोखरा येथे सुमारे १००० स्क्वेअर फुटांच्या युनिटपासून सुरुवात केली. तेथे केवळ पाच कर्मचारी होते. शर्ट्ससोबतच त्यांनी सरोंग, लुंगी आणि निर्यातीसाठी छापील कापडाचे उत्पादन सुरू केले. तसेच कंपन्यांसाठी डेनिम फॅब्रिकचे कंत्राटी उत्पादन सुरू केले. २०१५ मध्ये ‘ग्लोब’ने रेडीमेड डेनिम गार्मेंट व्यवसायात प्रवेश केला. जॅकेट, ड्रेस, हेवीवेट जीन्स आणि डेनिम शर्ट बनवायला सुरुवात केली.
दिग्गजांसह काम करतेय कंपनी
कंपनी थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरर म्हणून देशातील आणि परदेशांतील मोठ्या ब्रॅण्ड्सना वस्त्रांचा पुरवठा करते. कंपनीच्या भारतीय ग्राहकांमध्ये Being Human, Reliance, Spykar, John Players, Iconic, People व Bayer या ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कंपनी Inditex (Zara ची मूळ कंपनी), Splash Group व Landmark Group यांसारख्या मोठ्या ब्रॅण्ड्सना कापड (टेक्स्टाइल) पुरवठा करते. तसेच ती सिंगापूर, इंडोनेशिया, आखाती देश व लॅटिन अमेरिकेतील कंपन्यांनाही सेवा पुरवते.
आता १५०० कर्मचारी कार्यरत
आधी केवळ पाच कर्मचारी असलेल्या या कंपनीचे मनुष्यबळ १,५०० कर्मचाऱ्यांवर गेले आहे. हे कर्मचारी पाच वेगवेगळ्या युनिटमध्ये काम करतात. त्यापैकी सुमारे १,३०० कर्मचारी सेल्स आणि मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रात आहेत. बाकीचे कर्मचारी मार्केटिंग, फायनान्स, लॉजिस्टिक्स व प्रोडक्शन हाताळतात.
भाविन (वय ४६) यांचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. त्यांनी १९९७ मध्ये अहमदाबादच्या न्यू सौरभ उच्च माध्यमिक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी २००० मध्ये ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमधील स्विनबर्न विद्यापीठातून मार्केटिंग आणि फायनान्समधील बीबीए ऑनर्सची पदवी मिळवली.