Success Story Of Chandrashekhar Manda In Marathi : आपण सध्या जॉब शोधण्यासाठी नवनवीन ॲप, वेबसाईटवर अवलंबून असतो. या ॲप, वेबसाइटनुसार तुमच्या क्षेत्रातील, तुमच्या सोईनुसार जॉब शोधणे सोपे जाते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? या ॲप किंवा वेबसाईट उघडण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किती मेहनत घ्यावी लागत असेल. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गवंडी, सुतार, पेंटर , इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि इतरांना काम शोधण्यात मदत करणारी वेबसाईट सुरू केली.
चंद्रशेखर मंडल हे बिहारमधील दरभंगा येथील अमी गावचे रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०२० मध्ये त्यांनी बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. चंद्रशेखर यांनी एकदा त्यांच्या कार्यालयातून लेबर चौकातील मजुरांना पाहिले, जे त्यांच्या दैनंदिन कामासाठी तेथे बसले होते. या मजुरांची अवस्था पाहून ते अतिशय हळहळले. कोविड महामारीमुळे मार्च २०२१ मध्ये लॉकडाऊन होता; ज्यामुळे हे मजूर बेरोजगार झाले. हीच गोष्ट डोक्यात ठेवून चंद्रशेखर यांनी या मजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी काहीतरी करण्याचा संकल्प केला. चंद्रशेखर यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते बिहारमधील त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ४० हजार रुपये होते.
डिजिटल लेबर चौक सुरू केला :
मजुरांसाठी चंद्रशेखर यांना एक ॲप लाँच करण्याची कल्पना सुचली; ज्यामुळे कामगारांना दररोज चौकात जाण्याऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे काम शोधता येईल. ॲपसाठी त्यांनी सरकारी योजना, कर्ज कुठून मिळेल याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी मुद्रा कर्ज, प्रधानमंत्री रोजगार योजनेतून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. पण, अखेर त्यांना मेहनतीचे फळ मिळाले. कारण पुण्यातील एका इनक्युबेटरने त्यांना प्रकल्पासाठी १० लाख रुपयांची मदत देऊ केली.
चंद्रशेखर यांनी हिताची इंडिया आणि केरळ स्टार्टअप मिशनच्या उपक्रमांच्या नॅशनल इनोव्हेशन चॅलेंजमध्येही भाग घेतला; जेथे त्यांच्या स्टार्टअपची कल्पना निवडली गेली आणि त्यांना ३० लाखांचा सीड फंड मिळाला. त्यामुळे त्यांना त्यांचे ॲप लाँच करण्यास प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी मार्च २०२३ मध्ये ‘डिजिटल लेबर चौक’ (Digital Labor Chowk) नावाचे ॲप लाँच केले.
चंद्रशेखर यांच्या डिजिटल लेबर चौकाद्वारे भारतभरातील हजारो कामगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. मात्र, चंद्रशेखर यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. वेबसाईट तयार करण्यासाठी, मजुरांना रोजगार आणि योग्य मोबदला मिळू शकेल अशी जागा बनविण्यासाठी चंद्रशेखर यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. चंद्रशेखर यांचा उद्योजकीय प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, चिकाटीच्या साह्याने एखादी व्यक्ती इतरांना फायदेशीर ठरू शकते याचे उदाहरण आहे.
स्टार्टअपमुळे मजुरांना नोकऱ्या मिळाल्या :
चंद्रशेखरच्या ॲपमुळे हजारो मजुरांना काम मिळत आहे. या ॲपद्वारे अनेक कामगार नोकऱ्यांचा लाभ घेत आहेत. या ॲपद्वारे व्यावसायिक त्यांच्या व्यवसायांची नोंदणी करतात, नोकरीच्या आवश्यकता पोस्ट करतात, ॲपवर पैसे देतात. जेव्हा नोकरीबद्दल सूचना पोस्ट केली जाते. तेव्हा कर्मचाऱ्यांना नोटिफिकेशन प्राप्त होतात. बिहारव्यतिरिक्त, स्टार्टअपचा फायदा दिल्ली एनसीआर, झारखंड, उत्तर प्रदेशमधील मजुरांना देण्यात आला आहे.