Success Story Of Pankaj Chaddah : आपल्यातील अनेकांच्या मोबाइलमध्ये झोमॅटो ॲप असणे आता सामान्य झाले आहे. पंकज चड्ढा आणि दीपिंदर गोयल यांनी २००८ मध्ये झोमॅटोची स्थापना केली. दीपंदर गोयल हे झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ, तर झोमॅटोचे सह-संस्थापक पंकज चड्ढा आहेत. तर आज आपण पंकज चड्ढा यांचा प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत.

पंकज चड्ढा यांनी आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्यांच्या करिअरच्या वाटेने त्यांना कॉर्पोरेट जगताकडे नेले. २००८ मध्ये दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा नावाच्या दोन मित्रांनी भारतातील अनचार्टेड ऑनलाइन फूड स्पेसमध्ये प्रवेश करण्यासाठी बेन अँड कंपनीमधील त्यांच्या नोकऱ्या सोडल्या आणि झोमॅटोची स्थापना केली.

झोमॅटोची ओळख पहिल्यांदा ‘FoodieBay’ म्हणून करण्यात आली. २०१० मध्ये फूडीबे झोमॅटो म्हणून पुन्हा लाँच करण्यात आला. तसेच आता कंपनीचे नाव ‘इंटर्नल’ असे आहे. कंपनीने ६ फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

१० वर्षांनी सोडली झोमॅटोची साथ…

झोमॅटोने ऑनलाइन ऑर्डर, टेबल रिझर्वेशन, फूड डिलिव्हरी आणि पंकज चड्डा यांच्या निर्देशानुसार डिजिटल पेमेंटचा समावेश करण्यासाठी त्याच्या सेवांमध्ये विविधता आणली. गुंतवणूकदार, रेस्टॉरंट पार्टनर्सबरोबर कायमस्वरूपी संपर्क वाढवून अन्नाशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी व्यापक व्यासपीठ बनण्यासाठी पंकज चड्ढाने झोमॅटोला मदत केली. झोमॅटो फेमस झाला तरीही पंकज चड्डा तिथेच थांबले नाहीत. दहा वर्षांहून अधिक काळ झोमॅटोला उभे करण्यासाठी मदत केलेली संस्था सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मे २०१९ मध्ये एका नवीन अध्यायाला त्यांनी सुरुवात केली.

पंकज चड्ढा आणि त्यांची पत्नी पूजा खन्ना यांनी डिसेंबरमध्ये फिजिकल मेडिटेशन स्टुडिओ लाँच केला. पण, कोविड १९ मुळे लॉकडाऊन लागले आणि मग त्यांना ऑनलाइन मॉडेलकडे जावे लागले. २०२२ मध्ये मेडिटेशन स्टार्टअप माइंडहाऊससाठी (Mindhouse) एक ॲप लाँच केले आहे, जे मानसिक आरोग्य आणि निरोगी सेवांवर लक्ष केंद्रित करते. त्याचे नाव पुढे “Syft” असे ठेवण्यात आले. ते आता आपल्या डिजिटल सेवा वाढवण्यावर भर देत आहे.

पंकज चड्ढा यांनी फूड इंडस्ट्रीचा कायापालट केल्यानंतर नवीन व्यवसाय सुरू केला, त्यामुळे त्यांची गोष्ट चिकाटी, कठोर परिश्रमाचे सामर्थ्य दर्शवते.

हुरुन इंडियाच्या टॉप २०० स्वयंनिर्मित उद्योजकांच्या क्रमवारीनुसार, झोमॅटो या सुप्रसिद्ध अन्न वितरण सेवेचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २०२४ मध्ये Zomato च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आणि कंपनीचे मूल्यांकन तब्बल १९० टक्क्यांनी वाढून ९०० कोटी रुपयांवर पोहोचले, ज्यामुळे ४१ वर्षीय दीपिंदर गोयल $1.8 अब्ज (१५,२८४ कोटी रुपयांच्या) संपत्तीसह अब्जाधीश बनले आहेत.

Story img Loader