Success Story Of D Ranjit : बाळ जसजसे मोठे होत जाते, तसतसे आई-वडील त्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक होतात. मुलाचे बोबडे बोल त्यांना एक वेगळाच आनंद देतात. सहसा मुले एक वर्षानंतर हळूहळू बोलायला सुरुवात करतात. पण, काही मुलांना जन्मजात ऐकण्यात आणि बोलण्यात वारंवार अडचणी येतात. अशा समस्या असताना अनेक जण आपल्याला चिडवतात आणि आपण एखादी गोष्टी करू शकत नाही, असा अविश्वासही दाखवतात. तर आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत.
तर त्यांचे नाव आयएएस अधिकारी डी. रणजित, असे आहे. तमिळनाडूच्या कोइम्बतूर येथील हे दिव्यांग उमेदवार आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात एआयआर ७५० द्वारे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि अडचणींना तोंड देत आपले स्वप्न पूर्ण केले. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे काम नाही. पण, आपल्यासमोर अशी लाखो उदाहरणे आहेत, जी आपल्याला ही परीक्षा पास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रेरणा देत असतात. त्यातीलच हे एक आयएएस अधिकारी आहेत.
तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील रहिवासी असलेले डी. रणजित (IAS officer D Ranjit) यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांची आई अमृतावल्ली शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. लहानपणापासूनच रणजित यांना ऐकण्यात आणि बोलण्यात अडचणी येत होत्या. त्यांच्या आईने त्यांना लीप-रीडिंग शिकवले, ज्यामुळे ते बोलायला लवकर शिकू लागले. त्यानंतर रणजित यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी बारावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवले. अभियंता बनण्याच्या आकांक्षेने, त्यांनी नंतर बी.टेक. अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
कंपन्यांकडून बऱ्याच वेळा नकार (Success Story)
कॉलेज प्लेसमेंटदरम्यान त्यांना अनेक वेळा नकार मिळाला. अपंगत्वामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांना बऱ्याच वेळा नकार मिळाला. पण, या अडचणी आयुष्यात काहीतरी साध्य करण्याच्या त्यांच्या दृढनिश्चयाला धक्का देऊ शकल्या नाहीत. त्यानंतर रणजित यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. आईच्या अढळ पाठिंब्यामुळे त्यांनी स्वतःला यूपीएससीच्या तयारीसाठी समर्पित केले. त्यांना चालू घडामोडींबद्दल सांगणारे आणि शिकवणारे शिक्षक के. सबरीनाथन हे वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांच्या ओठांकडे लक्ष देत असत. तसेच कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचे फळ त्यांनी यूपीएससी २०२० च्या परीक्षेत AIR ७५० मिळवली. रणजित सध्या केरळमधील पलक्कड येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.