Success Story of Dr. Arokiaswamy Velumani: कष्ट करून आपल्या पोटाची खळगी भरणारे लोक कधी सुखाचे चार दिवस येतील याची वाट पाहत असतात. गरिबीच्या झळा सोसूनही आपलं ध्येय आणि स्वप्न साकार करण्यासाठी अगदी जीवाचं रान करणारे लोकच यशस्वी होतात. ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करताना अखंड मेहनत व सातत्य राखले, तर आपण शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, असं म्हणतात. अशाच गरिबीच्या खातेऱ्यात असतानाही अपार कष्टातून तीन हजार कोटींचा व्यवसाय उभारणाऱ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेले वेलुमणी यांना लहानपणापासूनच गरिबीची झळ सोसावी लागली. वेलुमणी यांचा जन्म भूमिहीन शेतकऱ्याच्या पोटी झाला. त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते, जिथे त्यांचे पालक त्यांच्या मुलांसाठी चप्पलसारख्या मूलभूत गरजाही भागवू शकत नव्हते.

हेही वाचा… ना कॉलेज, ना कोणती पदवी; वयाच्या १२व्या वर्षी कोडिंग शिकून बनला कोटींचा मालक, वाचा किशन बागरियाचा प्रेरणादायी प्रवास

वेलुमणी यांचं शिक्षण आणि अनुभव

इतक्या अडचणी असूनही वेलुमणी यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर थायरॉईड फिजिओलॉजीमध्ये पीएच.डी. केली, जी नंतर त्यांच्या व्यवसायाचा पाया बनली. वेलुमणी यांनी BARC मुंबई येथे १५ वर्षे कामाचा अनुभव घेतला. या अनुभवामुळे त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पायाभरणी करण्यात मदत झाली.

‘थायरोकेअर टेक्नॉलॉजीज’ची सुरुवात

मर्यादित संसाधनांसह वेलुमणी यांनी ‘थायरोकेअर टेक्नॉलॉजीज’ची स्थापना केली. आरोग्य सेवा ही गरिबांना परवडणारी आणि सर्वसामान्यांना उपलब्ध होईल अशी असावी, हा त्यामागे त्यांचा मुख्य हेतू होता. वेलुमणी यांच्या अथक परिश्रमाने थायरोकेअरचे अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगात रूपांतर झाले. एप्रिलपर्यंत कंपनीचे बाजारमूल्य ३,३०० कोटी रुपयांपर्यंत वाढले आणि हाच त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचा दाखला आहे.

‘थायरोकेअर टेक्नॉलॉजीज’च्या आधी वेलुमणी यांनी स्टार्टअपसाठी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीत त्यांनी १४०० कोटी रुपये गमावले. एवढे मोठ्या अपयशानंतर कोणीही सामान्य उद्योगपती कोसळून पडला असता. पण, त्यांनी हार न मानता, मेहनत व जिद्दीने त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि आपण असामान्य आहोत हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

हेही वाचा… अपघातात गमावले दोन्ही पाय पण पठ्ठ्याने जिद्द सोडली नाही; IIT-JEE परीक्षा उत्तीर्ण करत मिळवली गुगलमध्ये नोकरी, नागा नरेशचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचाच

वेलुमणी यांनी गरिबीतून वर येत, स्वकर्तृत्वावर व्यवसायाचे साम्राज्य उभारण्यापर्यंत केलेला प्रवास ही त्यांनी नवउद्योजकांना दिलेली प्रेरणा आहे, असे म्हणता येईल. चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या जोरावर कोणीही प्रतिकूल आव्हानांवर मात करून विलक्षण देदीप्यमान असे यश मिळवून दाखवू शकतो हे वेलुमणी यांच्या रूपानं एक उत्तम उदाहरण आहे, असे म्हणता येईल.