‘Success Story Of Dr Vikas Divyakirti : देशाच्या कानाकोपऱ्यांतून हजारो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देत असतात. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण कोचिंग सेंटरची मदत घेतात. तर आज देशातील सर्वांत लोकप्रिय कोचिंग सेंटर्सपैकी एक असलेल्या दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरची सुरुवात कोणी केली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरची सुरुवात डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांनी केली. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही आजवर पाहिले असतील. ते देशातील सर्वांत लोकप्रिय आयएएस प्रशिक्षकांपैकी एक आहेत. डॉक्टर विकास दिव्यकीर्ती हे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. पण, त्यांना शिकविण्याची आवड असल्यामुळे त्यांनी आयएएस अधिकाऱ्याची नोकरी सोडली होती. तर नक्की कसा होता त्यांचा प्रवास (Success Story )ते या बातमीतून सविस्तर जाणून घेऊ या.
डॉक्टर विकास दिव्यकीर्ती मूळचे हरियाणाचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण भिवानी येथील सरस्वती शिशु मंदिरात पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या झाकिर हुसेन महाविद्यालयामधून पदवी मिळवली. दिल्ली विद्यापीठात दिव्यकीर्ती यांनी सहायक प्राध्यापक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. १९९६ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी भारत सरकारच्या गृह मंत्रालयात एक वर्ष काम केले. पण, नंतर मिळालेले पद सोडून, त्यांनी पुन्हा शिकवण्यास सुरुवात केली.
‘दृष्टी आयएएस’ ची स्थापना केली :
१९९९ मध्ये विकास दिव्यकीर्ती यांनी गृह मंत्रालयाचा राजीनामा देऊन ‘दृष्टी आयएएस’ (Drishti IAS) ची स्थापना केली. ‘दृष्टी IAS’ ही भारतातील प्रमुख यूपीएससी कोचिंग संस्था आणि ऑनलाइन अभ्यास वेब पोर्टल्सपैकी एक आहे. दृष्टी आयएएसचे सोशल मीडियावरही अकाउंट आहे. येथे दिव्यकीर्ती मुलांना शिकवतात, त्याचे शैक्षणिक व्हिडीओ तयार करतात आणि विद्यार्थ्यांसाठी पोस्ट करतात. त्यांच्या दृष्टी आयएएसच्या यूट्यूब चॅनेलवर एक कोटीपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. दिल्ली विद्यापीठातून विकास दिव्यकीर्ती यांनी हिंदीमध्ये पीएच.डी. करून कायदा, व्यवस्थापन, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि इतर विषयांचा अभ्यास केला आहे.
‘दृष्टी आयएएस’ कोचिंगमध्ये ते विद्यार्थ्यांकडून केवळ यूपीएससीचीच नव्हे, तर आयुष्यातील परीक्षांचीही तयारी करून घेत असतात आणि त्यांच्या युजर्सनाही मोलाचा सल्ला देत असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आज एक शिक्षक, प्रेरक वक्ता व लेखक म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. तेव्हा डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांच्या यशाचा आलेख (Success Story) असा हा सातत्याने वर जात आहे.