Success Story of DSP Santosh Kumar Patel: आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर कष्ट, मेहनत ही घ्यावीच लागते. त्यातूनही गरिबी वाट्याला आली असेल, तर मग भुकेला काय मिळालंय न मिळालंय ते न पाहता कष्ट, मेहनत, प्रयत्न आदी सुरूच ठेवावे लागतात. हीच कष्टांची मालिका आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीनं अथक मेहनत घेत असतो. कितीही अपयश आलं, संकटं आली तरी ती मागे टाकून, सतत पुढे जाण्याची जिद्द आणि आशा त्याच्याकडे असली की सगळं काही शक्य होतं. अशाच संघर्षाला सामोरं जात विटा उचलण्याच्या कामापासून ते डीएसपी होण्यापर्यंतचा खडतर प्रवास संतोष कुमार पटेल यांनी केला आहे.

डीएसपी संतोष कुमार पटेल (DSP Santosh Kumar Patel)

पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) संतोष कुमार पटेल यांना लहानपणापासूनच अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांचे कुटुंब मध्य प्रदेशातील देवगाव या गावात तुटपुंज्या साधनांसह गरिबीत राहत होते. त्यांना एक वेळचंही पूर्ण जेवण मिळणंही कठीण व्हायचं. “चांगल्या दिवसांत आम्ही भात खायचो, बाकीचे दिवस फक्त दलिया (गहू) खायचो. कधी कधी आमच्याकडे गहू नसायचे तेव्हा आम्ही ज्वारीच्या रोट्या खायचो आणि शाळेत आमच्या मित्रांकडून गव्हाच्या रोट्या उधार घ्यायचो.” असं डीएसपी संतोष कुमार पटेल यांनी ‘द बेटर इंडिया’शी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा… Flipkartला विकली कंपनी अन्…, आज आहेत भारतातील सर्वात मोठ्या जिमचे संस्थापक; वाचा प्रसिद्ध उद्योजक मुकेश बन्सल यांची यशोगाथा

लहानपणापासूनच गरिबीचे साक्षीदार असलेले संतोष गवंडी वडील आणि शेतमजूर आई यांच्याकडून कष्टाचं मूल्य शिकले. ते अनेकदा त्यांचे वडील जेथे बांधकामाच्या ठिकाणी काम करायला जायचे आणि तेथे जाऊन त्यांना विटा उचलण्यास मदत करीत असत. तसेच, ते आईलादेखील शेतात मदत करीत असत. “उन्हाळ्यात त्यांनी (माझ्या वडिलांनी) गावात विहिरी बांधल्या. हे काम जोखमीचे असल्याने फार कमी गवंड्यांनी ते केले. काही वेळा ते विहिरीत काम करताना त्यांच्यावर दगड पडत असत. सुदैवानं दगड त्यांच्या डोक्यावर कधीच आदळला नाही; पण हात आणि पायांवर दगड आदळायचे,” असंही ते म्हणाले.

आपल्या मुलाला चांगले भविष्य देण्याचा निर्धार करून, त्यांच्या पालकांनी त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. घासलेटच्या दिव्याखाली शिक्षण घेत असताना आणि दहावीत उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करताना चिकाटी आणि समर्पणासह त्यांनी यशाच्या मार्गावर पाऊल टाकले. पोलीस दलात जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी संतोष यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. १५ महिन्यांच्या तयारीनंतर त्यांनी जुलै २०१७ मध्ये २२ व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली. अखेर २०१८ मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले.

हेही वाचा… बारावीनंतर सोडलं शिक्षण अन् सुरू केला पोल्ट्री व्यवसाय, आता आहेत कोट्यवधींचे मालक; जाणून घ्या सौंदरराजन भावंडांची अनोखी यशोगाथा

“मी जनतेची सेवा करीत राहण्याची आणि पोलिसांची प्रतिमा अधिक चांगली ठेवण्याची इच्छा बाळगतो; पोलिसांची भीती फक्त गुन्हेगारांनाच हवी. माझ्या तपासात, मी खात्री देतो की निरपराध लोकांना कधीही तुरुंगात टाकले जाणार नाही,” असंही संतोष म्हणाले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of dsp santosh kumar patel police officer of madhya pradesh career journey lifted bricks in poverty dvr