Success Story of Gaurav Kaushal : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक उमेदवार सरकारी नोकरीसाठी, तर काही तरुण उच्च शिक्षणासाठी तयारी करतात. पण, सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होणे फार कठीण असतं. लेखी परीक्षेबरोबरच उमेदवारांना मुलाखतही द्यावी लागते. तर आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयआयटी (IIT) शिक्षण, बीआयटीएस (BITS) केलं आणि यूपीएससी (UPSC) परीक्षेत ऑल इंडिया ३८ वा रँक (AIR) मिळवला. तरीही आयडीईएस अधिकारी म्हणून १२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी राजीनामा देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. एखाद्या व्यक्तीला अशा यशापासून दूर जाण्यास नक्की कोणती गोष्ट प्रवृत्त करते? त्यांनी नेमका हा निर्णय का घेतला असेल? त्यांचा प्रवास कसा होता? याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…
गौरव कौशल असे या व्यक्तीचं नाव आहे. हरियाणातील पंचकुला येथून गौरव कौशलचा यांचा प्रवास सुरू झाला. गौरव सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी होते. आयआयटी-जेईई परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते आयआयटी दिल्लीत गेले. त्यांनी आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. पण, त्यांच्या ध्येयाचा मार्ग त्याच्याशी जुळला नाही. कारण ते काहीतरी वेगळं करण्याच्या धडपडीत होते.
त्यानंतर त्यांनी आयआयटी (IIT) सोडण्याचा निर्णय घेतला आणि BITS Pilani मध्ये BTech साठी कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. पण, तिथेही त्यांना काहीतरी चुकतंय असंच वाटलं. गौरव यांनी अखेरीस पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. नवीन आव्हानांवर मात करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या गौरव यांनी यूपीएससी परीक्षेकडे आपले लक्ष वळवले.
१२ वर्षांच्या सेवेनंतर राजीनामा :
२०१२ मध्ये त्यांनी यूपीएससीमध्ये ऑल इंडिया ३८ वा रँक प्राप्त केला आणि इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस (IDES) मध्ये सामील झाले. पण, आयडीईएस अधिकारी म्हणून १२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी राजीनामा देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. अनेकांना चकित करणारा हा निर्णय घेण्यामागचे गौरव यांचे नेमकं उद्दिष्ट काय होतं?
तर गौरव यांनी यूपीएससी इच्छुकांच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी राजीनामा दिला. आज गौरव एक यशस्वी मार्गदर्शन कार्यक्रम चालवतात. त्यांचा हा कार्यक्रम यूट्यूब चॅनेल आणि मोबाइल ॲपद्वारे हजारो लोकांपर्यंत पोहोचतो; जिथे ते विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात. खरे यश हे केवळ समाजाला प्रतिष्ठित असलेल्या गोष्टी साध्य करणे नव्हे तर स्वतःच्या प्रवासात वैयक्तिक पूर्तता शोधणे आहे, असे गौरव यांच्या प्रेरणादायी प्रवासातून आपल्याला पाहायला मिळाले आहे.