Success Story of Harshit Godha: भोपाळच्या हर्षित गोधा यांनी ब्रिटनमध्ये बीबीएचे शिक्षण घेतले, परंतु अचानक त्यांनी शेती शिकण्याचा निर्णय घेतला. त्याचं झालं असं की, लंडनमध्ये बीबीएचे शिक्षण घेत असताना हर्षित यांना इस्त्रायलमधून आयात केलेले ॲव्हकाडोचे पॅकेट पाहून इस्रायली शेती तंत्रात रस निर्माण झाला.
हर्षित यांची इच्छाशक्ती आणि प्रयत्न इतके जोरदार होते की त्यांनी इस्रायली शेतकऱ्यांकडून शेती शिकून २०१९ मध्ये भोपाळमध्ये ‘इंडो इस्रायली ॲव्हकाडो’ नावाची कंपनी सुरू केली. आज ते ॲव्हकाडो शेतीतून भरपूर कमाई करत आहेत. चला, तर मग हर्षित गोधा यांच्या या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.
इस्रायली शेतकऱ्यांकडून घेतले प्रशिक्षण
भोपाळमधील वकिलांच्या कुटुंबातील हर्षित यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. यासाठी त्यांनी ब्रिटनमधून बीबीएचे शिक्षण घेतले असूनही शेतीच्या वाटेला जाण्याचा निर्णय घेतला. बीबीएच्या शिक्षणानंतर हर्षित यांनी इस्रायली पद्धतीने शेती शिकून ॲव्हकाडोची शेती सुरू केली. यासाठी त्यांनी इस्रायली शेतकऱ्यांकडून प्रशिक्षण घेतले.
आता ते भोपाळमध्ये व्यावसायिक ॲव्हकाडो शेती करत आहेत. ॲव्हकाडो हे एक विदेशी फळ आहे. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हर्षित यांनी भोपाळमध्ये पाच एकर जमिनीवर १८०० ॲव्हकाडोची रोपे लावली आहेत. हर्षित यांनी वडिलोपार्जित व्यवसाय सोडून ही शेती सुरू केली आहे.
पाच एकरात बांधली बाग
खरंतर हर्षित यांना पाच एकरची नापीक जमीन ॲव्हकाडो बागेत बदलायची होती, त्यासाठी त्यांनी मोठी गुंतवणूकही केली होती. तथापि, कोविड-१९ आणि इतर समस्यांमुळे इस्रायली वनस्पतींची आयात २०२१ मध्ये होऊ शकली. उशीर झाल्यामुळे ॲव्हकाडो झाडे मोठी होत गेली आणि त्यामुळे शिपिंग महाग झाली. असे असूनही त्यांनी हार मानली नाही. हर्षित यांनी २०२१ पासून आतापर्यंत २०,००० रोपांची ऑर्डर दिली आहे.
भोपाळ विमानतळाजवळ त्यांनी स्वतःची पाच एकर बाग तयार केली आहे. २०२३ मध्ये लावलेल्या या बागेला आता फळे येऊ लागली आहेत. हर्षित अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रोपे विकतात आणि त्यांना मोफत सल्लाही देतात.
हर्षित यांना विश्वास होता की जर लोक लंडन इस्रायलमधून ॲव्हकाडो ऑर्डर करत असतील तर ते नक्कीच खास असतील. इंटर्नशिप सोडून ते शेती शिकण्यासाठी इस्रायलला गेले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर हर्षित भारतात परतले आणि इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त दरात ॲव्हकाडो पिकवण्याचा निर्णय घेतला.
वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये
रोपांच्या विक्रीतून हर्षित यांचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये इतके आहे. त्यांना त्यांची बाग १०० एकरांपर्यंत वाढवायची आहे. भोपाळमधील वकिलांच्या कुटुंबातील हर्षित यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. हर्षित भोपाळमध्येच १०० एकरांची दुसरी बाग लावत आहेत. यातून त्यांना वर्षाला १० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.