Success Story Of Himanshu Thapliyal : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. मात्र, अपयशी होण्यासारखे दुसरे दुःखही नाही. आजच्या काळात परीक्षेचे यशच विद्यार्थांचे यश मानले जाते. पण, काही जण ही अपयशाची पायरी चढून त्यांची स्वप्ने, त्यांचे ध्येय पूर्ण करतात आणि यशस्वी होतात; तर आज आपण अशाच एका विद्यार्थ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने २०२३ मध्ये यूपीएससीच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अखिल भारतीय रँक (AIR) १ मिळवला.

कर्नाटक सुरथकल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी २०२३ बॅचच्या एम टेक नॅनोटेक्नॉलॉजी बॅचचे माजी विद्यार्थी हिमांशू थापलियाल यांनी यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अखिल भारतीय रँक (AIR) १ मिळवून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे, पण त्यांच्या प्रवासात त्यांना लगेच यश मिळाले नाही.

उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या आणि लखनऊमध्ये वाढलेल्या हिमांशूचा शैक्षणिक प्रवास ५,८३,००० च्या जेईई रँकने सुरू झाला. त्याने एनपीएसईआय, पिथोरागढ येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केले. त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ तेव्हा मिळाले जेव्हा त्याने गेट परीक्षा उत्तीर्ण केली आणि २०२१-२०२३ टर्मसाठी एनआयटीके सुरथकल येथील एमटेक नॅनोटेक्नॉलॉजी प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवला.

एनआयटीकेमधील त्याने घालवलेल्या क्षणाचा विचार करताना हिमांशू म्हणाला, ‘सुरुवातीला मला आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवणे कठीण होते. एनआयटीकेने मला एक्सपोजर, उत्तम मैत्री आणि पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली स्पष्टता दिली.’ या परिवर्तनशील काळाने त्याच्या भविष्यातील कामगिरीचा पाया रचला.

हिमांशूचे ध्येय केवळ उच्च पद मिळवण्यापुरते मर्यादित नव्हते. त्याच्यासाठी ऑल इंडिया रँक १ हे भारतीय दूरसंचार सेवांमध्ये सामील होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते, हेच स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. “ऑल इंडिया रँक १ या रँकसह, मी अखेर ते ध्येय साध्य करू शकलो. माझे लक्ष आता प्रणाली समजून घेणे, मी कुठे योगदान देऊ शकतो हे ओळखणे आणि शक्य तितक्या मार्गाने समाजाला मदत करणे यावर आहे; असे हिमांशू थापलियाल याने सांगितले आहे. हिमांशूची गोष्ट कठोर परिश्रम, असंख्य इच्छुकांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्यांच्या ध्येयांसाठी वचनबद्ध राहण्याची मोठी प्रेरणा देतो आहे.