Success Story Of Hritwik Haldar : असे अनेकदा म्हटले जाते की, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर कोणतेही अपयश तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. हृतिक हलदरची (Hritwik Haldar) प्रेरणादायी कहाणी हेच सिद्ध करते. सुरुवातीला तो उत्तम कामगिरी करणारा विद्यार्थी नव्हता. त्याने त्याचे शिक्षण बंगाली माध्यमाच्या शाळेत सुरू केले. त्याला अभ्यास करण्याची अजिबात आवडत नव्हती. अभ्यास करणे एक ओझे वाटत असे, कारण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते आणि तो फक्त धडे लक्षात ठेवण्यावर अवलंबून होता.
पण, तो दहावीत असताना परिस्थिती बदलली. हृतिकने घोकंपट्टी थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. या छोट्याशा बदलामुळे त्याच्या अभ्यासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा फरक पडला. त्याला शिकण्याचा आनंद मिळू लागला आणि तो सतत प्रगती करत राहिला.
पहिली मोठी कामगिरी
हृतिकची मेहनत फळाला आली जेव्हा त्याने त्याच्या हायस्कूलच्या परीक्षेत ९३.४% गुण मिळवले. पण, त्याचा प्रवास संघर्षांशिवाय जणू काही अपूर्णच होता. हायस्कूलनंतर त्याने जेईई, जेईई ॲडव्हान्स्ड, नीट आणि केव्हीपीवायसारख्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या, पण त्याला अनेक वेळा अपयश आले. या अडचणी असूनही त्याने हार मानली नाही आणि त्याचे प्रयत्न सुरू ठेवले.
बेलूरमधील प्रतिष्ठित रामकृष्ण मिशन स्कूल (आरकेएम) मध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यावर त्याच्या आयुष्याला एक मोठे वळण आले. तिथल्या वातावरणामुळे स्व-अभ्यासाला प्रोत्साहन मिळाले. तिथे उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध झाली, त्यामुळे त्याला विषयांबद्दल, विशेषतः रसायनशास्त्राबद्दलची त्याची समज वाढण्यास मदत झाली. जरी तो पुन्हा एकदा केव्हीपीवाय एसबी परीक्षेत नापास झाला, तरी त्याने एससी कॅटेगरीमध्ये १० वी रँक मिळवली आणि आयआयएसईआर पुणे येथे प्रवेश मिळवला.
एमआयटीमध्ये पोहोचला…
आयआयएसईआर पुणे येथे हृतिकचा शैक्षणिक प्रवास नवीन उंचीवर जाऊन पोहोचला. त्याने समीक्षात्मक विचारसरणी, संशोधन आणि संकल्पना बांधणीमध्ये मजबूत कौशल्ये विकसित केली. त्याने स्वतःला सुधारण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम केले. त्याच्या समर्पणाने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) चे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. हृतिकची कहाणी आपल्याला शिकवते की अपयश हा शेवट नाही. दृढनिश्चय, संयम आणि आत्मविश्वास आणि खूप अभ्यास करून आपण कोणत्याहीअडचणींवर मात करू शकतो आणि आपली स्वप्ने साध्य करू शकतो.