Success Story of IAS officer Suhas Yathiraj : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमधील सहसचिव या पदासाठी केंद्र सरकारने २००७ च्या बॅचमधील सहा आयएएस आयएएस अधिकाऱ्यांची निवड केली आहे. अरविंद अग्रवाल, परवीन कुमार थिंड, दुस्मंता कुमार बेहरा, प्रभाकर, विनोद कुमार सुमन, सुहास यथीराज या सहा जणांपैकी सुहास यथीराज हे उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याच प्रवासाबद्दल (Success Story) आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सुहास यथीराज (Suhas Yathiraj) हे आयएएस अधिकारी सुहास हे मूळचे कर्नाटकचे असून, त्यांचा जन्म १९८३ मध्ये झाला. त्यांचा उजवा पाय पूर्णपणे कार्यक्षम नसल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अपंगत्व आहे. असे असूनही त्यांनी आपल्या कारकिर्दीत (Success Story) मोठे यश संपादन केले आहे. सुहास यथीराज हे भारताचे पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांनी टोकियो २०२० व पॅरिस २०२४ या खेळांमध्ये रौप्यपदके जिंकली आहेत. तसेच खेळांमध्ये एकापाठोपाठ पदके जिंकणारे ते एकमेव भारताचा पॅरा-बॅडमिंटनपटू ठरले आहेत. त्याचबरोबर पॅरा ऑलिम्पिक पदक आणि अर्जुन पुरस्कार जिंकणारे सुहास हे एकमेव आयएएस अधिकारी आहेत.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमधील सहसचिव या पदासाठी केंद्र सरकारने ज्या अधिकाऱ्यांची निवड केली आहे, त्या यादीत २००७ च्या बॅचमधील सहा आयएएस अधिकाऱ्यांव्यतिरिक्त २००३, २००४ व २००५ बॅचमधील आयएएस अधिकारी, तसेच सीएसएस सेवेतील एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात उत्तराखंडमधील दोन वरिष्ठ आयएएस अधिकारी, डॉक्टर राघव लैंगर व ज्योती यादव यांना भारत सरकारमध्ये सहसचिव स्तरावर पदोन्नती देण्यात आली. हे दोन्ही अधिकारी उत्तराखंड केडरच्या २००९ च्या बॅचचे आहेत.
आयएएस अधिकाऱ्याच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीचे निकष –
जेव्हा एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते, तेव्हा त्यांना विशिष्ट राज्य केडरमध्ये नियुक्त केले जाते. त्या राज्यात नऊ वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर ते केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी पात्र ठरतात. केंद्रीय पदांसाठी अर्ज करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित राज्य सरकारकडून एनओसी प्रमाणपत्र (No Objection Certificate ) प्राप्त करणे आवश्यक ठरते.
केंद्र सरकारने त्यांच्या प्रतिनियुक्तीला मान्यता दिल्यानंतर ते जास्तीत जास्त पाच वर्षे केंद्रात सेवा देऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये हा कालावधी दोन वर्षांनी वाढविलाही जाऊ शकतो. कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या राज्य केडरमध्ये परतले पाहिजे आणि दुसऱ्या केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी किमान तीन वर्षे तेथे काम करणे आवश्यक असते.