Success Story Of IAS Couple : आतापर्यंत तुम्ही अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा ऐकल्या वा पाहिल्या असतील. पण, आज आपण एक प्रेमळ गोष्ट जाणून घेणार आहोत. सोशल मीडियावर दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची बरीच चर्चा होत आहे. प्रवीण कुमार आणि अनामिका सिंह या आयएएस अधिकाऱ्यांची सुंदर प्रेमकहाणी सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. दोघेही २०२० च्या आयएएस बॅचचे उमेदवार आहेत आणि तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर ते अधिकारी बनले. गोरखपूरमध्ये त्यांचं लग्न झालं. अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

नागरी सेवा परीक्षा (CSE) देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणून ही परीक्षा ओळखली जाते. या दोन प्रतिष्ठित आयएएस अधिकाऱ्यांनी यूपीएससी परीक्षा उल्लेखनीय यश मिळवीत उत्तीर्ण केली. दोघेही मूळचे बिहारचे आहेत. पण, प्रवीण सध्या बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील हिल्साचे एसडीएम आहेत; तर अनामिका उत्तराखंडच्या गढवाल जिल्ह्यातील एसडीएम आहेत. चला तर जाणून घेऊ त्यांच्या या प्रवासाबद्दल…

कोण आहे अनामिका सिंग?

अनामिका सिंगचा जन्म बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील आहे. अनामिका सिंग यांचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण यमुनानगर येथील आर्मी स्कूलमध्ये झाले. सीए अभ्यासक्रमाच्या इंटरमिजिएट परीक्षेनंतर त्यांनी एआयटी पुणे येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक.सुद्धा केली. त्यानंतर यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या. त्यादरम्यान त्यांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) परीक्षेलाही बसून, प्रभावी ऑल इंडिया रँक (AIR 8) मिळवली. पण, त्यांनी २०२० मध्ये तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण करून ऑल इंडिया रँक ३४८ (AIR 348) मिळवली. २०२१ मध्ये, त्यांची उत्तराखंडमध्ये आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

कोण आहे प्रवीण कुमार?

प्रवीण कुमार यांचा जन्म बिहारमधील जमुई येथे झाला. प्रवीण कुमार यांचे वडील मेडिकल स्टोअर चालवतात. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण जमुई येथे झाले. नंतर, त्यांनी जेईई परीक्षादेखील उत्तीर्ण केली आणि आयआयटी कानपूर येथे बी.टेक. (B.tech.) पदवीसाठी प्रवेश घेतला, जो भारतातील सर्वांत प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. पदवीनंतर कुमार यांनी यूपीएससी सीएसईची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले असले तरी शेवटी २०२० मध्ये त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक ७ (AIR 7) मिळवली. सध्या ते बिहार केडरमध्ये तैनात आहेत.

Story img Loader