Success Story of IAS Rukamani Riar: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससी परीक्षेला बसतात, परंतु सर्वांनाच ही परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. त्याचबरोबर कठोर परिश्रम केले तर परीक्षेत यश मिळवणे कठीण नाही. आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत, जी शाळेत एकदा नापास झाली होती, परंतु तिने पहिल्याच प्रयत्नात ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली.

सहावीत झाली होती नापास

आपण आयएएस रुक्मिणी रियारबद्दल बोलत आहोत. १९८७ मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर येथे जन्मलेल्या रुक्मिणी रियार शालेय शिक्षणादरम्यान सरासरी विद्यार्थिनी होती. ती सहावीतही नापास झाली होती. तिने गुरुदासपूरम येथे शिक्षण घेतले आणि नंतर डलहौसी येथील सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर तिने अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

२०११ मध्ये दिली UPSC परीक्षा

शिक्षणानंतर रुक्मिणीने म्हैसूरमधील अशोदय आणि मुंबईतील अन्नपूर्णा महिला मंडळ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये इंटर्नशिप केली. एनजीओमध्ये काम करत असताना तिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये रुक्मिणी यूपीएससी परीक्षेला बसली आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात ती केवळ निवडली गेली नाही तर ऑल इंडिया टॉपरदेखील ठरली. तिने दुसरा क्रमांक पटकावला. तिने या परीक्षेसाठी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. रुक्मिणीने हे यश स्व-अभ्यासातून मिळवले.

अशी केली तयारी

एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने सहावी ते बारावीपर्यंतची एनसीईआरटीची पुस्तके वाचली. मला दररोज वर्तमानपत्रे आणि मासिके वाचण्याची सवय लागली, ज्यामुळे मला मुलाखतीत खूप मदत झाली. याशिवाय तिने अनेक मॉक टेस्ट दिल्या, जेणेकरून ती तिच्या चुका सुधारू शकेल. याशिवाय ती गेल्या वर्षीचे पेपर्सही सोडवायची.