Success Story Of Pranav Goyal : संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. ही भारतातील जागतिक स्तरावरील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. आयआयटीमध्ये जागा मिळवण्याच्या आशेने भारतभरातील हजारो विद्यार्थी दरवर्षी आयआयटी-जेईईसाठी प्रयत्न करतात. पण, यासाठी सगळ्यात आधी जेईई मुख्य आणि ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. तर आज आपण अशाच एका विद्यार्थ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत.
प्रणव गोयल मूळचा चंदिगडचा आहे. २०१८ मधील जेईई परीक्षेत तो केवळ उत्तीर्णच नाही तर अव्वलसुद्धा ठरला. तर इयत्ता १० वीमध्ये १० CGPA मिळवून आणि CBSE इयत्ता १२ वीमध्ये नॉन मेडिकल स्ट्रीममध्ये ट्रायसिटी (चंदिगड, पंचकुला आणि मोहाली) चे नेतृत्व करून, चंदिगडच्या रहिवाशाने आधीच आपली शैक्षणिक ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर जेईई मेन २०१८ मध्ये, ऑल इंडिया रँक (एआयआर) ४ देखील मिळवला.
एका मुलाखतीमध्ये हरियाणातील पंचकुलाच्या सेक्टर १५ मधील भवन विद्यालयाच्या प्रणव गोयल विद्यार्थ्याने सांगितले की, ही परीक्षा पास होणे कठोर परिश्रम आणि चिकाटीचे परिणाम आहे. परीक्षा पास होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. सुरुवातीला फक्त टॉप १० मध्ये स्थान मिळवायचे होते, पण जसजसा वेळ पुढे गेला, जेईईमध्ये टॉप व्हायचे होते; असे प्रणव गोयलने सांगितले.
चंदिगडमध्ये प्रणव गोयलचे आई-वडील, पंकज गोयल आणि ममता गोयल यांचा फार्मास्युटिकलचा (pharmaceutical) व्यवसाय आहे. प्रणव गोयलला त्याच्या शिक्षकांनी आणि पालकांनीही खूप पाठिंबा दिला, त्याला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. पौराणिक कादंबऱ्या वाचून किंवा चित्रपट पाहून तो तणावमुक्त व्हायचा. त्याला अभ्यासाचे वेड नव्हते, जसे सर्व टॉपर्सना असते. त्याला फक्त हे माहीत होते की, आवश्यक असेल तेव्हा फक्त शैक्षणिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे; असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
तर आता प्रणव गोयल काय करतो आहे ?
२०१८ मधील जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा विजेता सध्या हाँगकाँगमध्ये आहे, जिथे तो जेन स्ट्रीटसाठी क्वांटिटेटिव्ह ट्रेडर (व्यापारी) [quantitative trader] म्हणून काम करतो आहे. ही एक जगभरातील ट्रेडिंग कंपनी आहे, जी मालमत्तेचा व्यापार करते आणि तंत्रज्ञान आणि परिमाणात्मक संशोधनाच्या व्यापाराद्वारे वित्तीय बाजारांची कार्यक्षमता सुधारते.
याव्यतिरिक्त प्रणवने आयआयटी बॉम्बे येथे संगणक शास्त्रात बीटेक केले, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारीनुसार भारतातील सर्वोत्कृष्ट आयआयटीपैकी एक आहे. महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्याने आपले शिक्षण चालू ठेवले. २०१९ मध्ये त्याने आयआयटी बॉम्बे आणि नंतर नॅनोस्निफ टेक्नॉलॉजीज, वेदांतू येथे डेटा विश्लेषक इंटर्न म्हणून काम केले. २०२० मध्ये त्याने जर्मनीतील ब्रॉनश्विग टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च इंटर्न म्हणून वेळ घालवण्यापूर्वी फार्मास्युटिकल कंपनीचे ॲप्लिकेशन डेव्हलपर इंटर्न म्हणून काम केले. २०२१ पर्यंत त्याने वित्त क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले होते. अधिक जाणून घेण्यासाठी, त्याने जेन स्ट्रीट, हाँगकाँगमधील बहुराष्ट्रीय व्यापार कंपनी आणि नंतर अल्फाग्रेप येथे ट्रेडिंग इंटर्न म्हणून काम करण्यास सुरुवात केली.