Success story of Jayanti Chauhan: टाटा समूहाचे दिवंगत चेअरमेन रतन टाटा हे त्यांच्या दूरदर्शी आणि चतुरस्त्र दृष्टीसाठी ओळखले जातात. यासोबतच त्यांचे परोपकारी व्यक्तिमत्त्वही लोकांना चांगलेच ठाऊक आहे. याच कारणामुळे २०२२ मध्ये जेव्हा भारतातील सर्वात मोठ्या पॅकेज्ड मिनरल वॉटर ब्रँड बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांना त्यांचा व्यवसाय विकायचा होता, तेव्हा रतन टाटा यांनी तो विकत घेण्यासाठी हात पुढे केला.
रमेश चौहान हे ‘ॲक्वा किंग’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी आपला व्यवसाय विकण्याबाबत बोलले असता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खरंतर वाढत्या वयानुसार रमेश चौहान यांना दैनंदिन व्यवसायाची कामे सांभाळायची नव्हती आणि त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान यांना कंपनी चालवण्यात काहीच रस नव्हता, त्यामुळे ते आपला व्यवसाय रास्त भावाने विकण्यास तयार होते. चौहान यांच्या घोषणेने बाजारात खळबळ उडाली. जवळपास ५५ वर्षे भारताच्या पॅकेज्ड पेयजल बाजारावर राज्य करणाऱ्या बिस्लेरी ब्रँडच्या खरेदीसाठी अनेक संभाव्य खरेदीदार रांगेत उभे होते.
मोठ्या कंपन्यांनी ऑफर दिल्या
पेप्सी आणि टाटासारख्या जागतिक दिग्गजांनी बिस्लेरी खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. भारतीय पॅकेज्ड वॉटर सेक्टरमध्ये बिस्लेरीचा ३२% हिस्सा आहे. या कंपनीने भारतात सुमारे १२२ प्लांट उघडले आहेत, त्याचे ४,५०० हून अधिक वितरक आहेत.
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बिस्लेरीसाठी ७,००० कोटी रुपयांची ऑफर दिली. ही चांगली किंमत होती, परंतु रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि कंपनीची जबाबदारी स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतला.
बिस्लेरीचा व्यवसाय हाती घेतल्यानंतर जयंती चौहान यांनी वडिलांच्या कंपनीसाठी मेहनत घेतली. त्यांच्या कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. वर्ष २०२२-२३ मध्ये जयंतीच्या नेतृत्वाखाली, बिस्लेरी इंटरनॅशनलने २,३०० कोटी रुपयांचा महसूल मिळवला.
कोण आहेत जयंती चौहान?
जयंती बिस्लेरी इंटरनॅशनलचे संस्थापक रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी आहे. जयंती यांचा जन्म दिल्लीत झाला, जिथे त्यांनी शालेय शिक्षण आणि पुढील शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. जयंती चौहान यांनी नंतर न्यूयॉर्कमधील लॉस एंजेलिस येथील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइजिंग (FIDM) मधून पदवी प्राप्त केली.