Success Story Of Junaid Ahmad In Marathi : आयएएस अधिकारी बनण्याचा प्रवास प्रेरणादायी असला तरीही यश त्याच व्यक्तीला मिळते, ज्याला ते बाह्य मनातून नव्हे, तर अंतर्मनातून मिळवायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणसाने आपली विचारसरणी सकारात्मक ठेवून स्वत:वर नेहमीच विश्वास ठेवला पाहिजे आणि कितीही वेळ लागला तरी सातत्याने प्रयत्न करीत राहिले पाहिजे. तर, आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांचे नाव आहे जुनैद अहमद (Success Story Of Junaid Ahmad).
उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील नगीना या शांत गावात जुनैद अहमद यांचा जन्म झाला. वडील, आई, एक मोठी बहीण व दोन लहान भावंडांसह जुनैद अहमद एका सामान्य कुटुंबात वाढले. त्यांचे वडील वकील, तर आई गृहिणी होती. भारतातील अनेक तरुणांप्रमाणेच देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी यूपीएससी (UPSC) ही परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण, त्यांची कथा झटपट यश मिळाले, अशी नव्हती.
जुनैद शैक्षणिकदृष्ट्या प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी नव्हते. त्याच्या संपूर्ण शालेय आणि महाविद्यालयीन वर्षांमध्ये सुमारे ६० टक्के त्यांचा सरासरी स्कोअर होता. त्यांनी शाळा, कॉलेजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली नसली तरीही त्यांनी कठोर परिश्रम आणि विश्वासाने पुढील प्रवास सुरू केला (Success Story Of Junaid Ahmad).
एकदा, दोनदा नव्हे, तर तीनदा अपयशी ठरले
नोएडा येथील शारदा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर जुनैद यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली. त्यांचा प्रवास सोपा नव्हता. कारण- ते एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीनदा या परीक्षांमध्ये अपयशी ठरले. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येक अपयश हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. पण, त्यांनी स्वतःवरील विश्वास कायम ठेवला आणि परिणामत: चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.
त्यांनी परीक्षेत ३५२ वी अखिल भारतीय रँक (एआयआर) मिळवली आणि भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) स्वतःचे स्थान मिळवले. अनेकांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला असता: पण जुनैद समाधानी नव्हते. कारण- त्यांना आयएएस अधिकारी म्हणून देशसेवा करण्याची इच्छा होती. ध्येय गाठण्याच्या निर्धाराने त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. २०१८ मध्ये पाचव्या प्रयत्नात, जुनैद यांना मेहनतीचे मोठे फळ मिळाले. त्यांनी केवळ परीक्षा उत्तीर्णच केली नाही, तर एक प्रभावी एअर इंडिया रँक ३ (AIR 3) मिळवून त्यांचे कुटुंब, त्यांचे गाव आणि इतर असंख्य लोकांमध्ये त्यांनी नाव मोठे केले. जुनैद अहमद यांनी दाखवून दिले की, यश केवळ नैसर्गिकरित्या देणगी मिळालेल्यांच्या नशिबात नसते; तर अथक प्रयत्न करणाऱ्या, इच्छुक असलेल्या त्या प्रत्येकासाठी असते. तसेच स्वतःबाबत शंका घेणाऱ्या प्रत्येक इच्छुकासाठी जुनैद यांचा प्रवास म्हणजे एक प्रेरणादायी उदाहरण आहे (Success Story Of Junaid Ahmad)…