Success Story Of Mahmood Akram : आपल्यातील अनेकांना नवनवीन भाषा शिकायला भरपूर आवडते. मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच या जगात अनेक भाषा शिकण्यासारख्या आहेत; तर काही जणांना याच भाषा शिकण्याची प्रचंड आवड असते. तर आज आपण अशाच एका तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत. चेन्नईतील १९ वर्षीय महमूद अक्रम या तरुणाने आपल्या अविश्वसनीय भाषा कौशल्याने सर्वांना चकित केले आहे. ४०० भाषा शिकलेल्या आणि ४६ भाषा अगदी उत्तमपणे बोलून दाखवणाऱ्या या तरुणाने भाषा शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे.

त्याच्या वडिलांनी लहान वयातच अक्रमला या मार्गावर नेण्यास सुरुवात केली होती, तेव्हापासूनच महमूद अक्रम याने अनेक जागतिक विक्रम मोडले आहेत, त्यामुळे आता जगभरातील विद्यार्थी या तरुण प्रतिभावान व्यक्तीच्या उत्साहाने प्रेरित होत आहेत, ज्यामध्ये म्यानमार आणि कंबोडियासारख्या देशांमध्ये भाषा शिकवणे आणि कार्यशाळा आयोजित करणे समाविष्ट आहे. अक्रमच्या यशाने हे दाखवून दिले की, संवादाच्या कलेत यशस्वी होण्यासाठी वय महत्त्वाचे नाही.

अक्रमला भाषांविषयी आकर्षण असल्याने त्याने कमी वयातच भाषा शिकण्यास सुरुवात केली. त्याचे वडील, जे स्वतः १६ भाषा बोलतात. . त्यांच्या नोकरीमुळे जेव्हा त्यांना इस्रायल, स्पेनसारख्या ठिकाणी जावे लागले, तेव्हा एखाद्या विशिष्ट राज्याची किंवा देशाची भाषा येत नसल्याने त्यांना त्यावेळी खूप संघर्ष करावा लागला. मुलाला भाषेमुळे कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये अशी वडिलांची इच्छा होती. जेव्हा अक्रमची आई गरोदर होती, तेव्हा आई-वडील दोघेही भाषांविषयी या आशेने चर्चा करत होते की, त्या बाळाला भाषेविषयी आवड निर्माण होईल आणि अक्रमच्या बाबतीत ते यशस्वीसुद्धा झाले.

अक्रमचा खरा प्रवास वयाच्या चौथ्या वर्षी सुरू झाला, जेव्हा त्याच्या पालकांनी त्याला तमिळ आणि इंग्रजी भाषा शिकवायला सुरुवात केली. तेव्हा त्याने सहा दिवसांत इंग्रजी भाषा आणि फक्त तीन आठवड्यात तमिळची २९९ अक्षरे शिकला.

२० भाषांमध्ये भारताचे राष्ट्रगीत लिहिले (Success Story)

अक्रम सहा वर्षांचा असताना त्याला वडिलांपेक्षा जास्त भाषा शिकल्याचा आनंद होता. त्यामुळे त्याच्यामध्ये अधिक भाषा शिकण्याची इच्छा निर्माण झाली. अक्रम आठ वर्षांचा होता तेव्हा तो पन्नास भाषांमध्ये बोलण्यात माहीर झाला होता. वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी काही पाठ्यपुस्तके आणि ऑम्निग्लॉट (लेखन आणि वाचन भाषांसाठी एक ऑनलाइन ज्ञानकोशवर अवलंबून राहावे लागे, असे अक्रम म्हणाला. वयाच्या आठव्या वर्षी त्याने ‘सर्वात तरुण द्विभाषिक टाइपरायटर’ म्हणून पहिला जागतिक विक्रम प्रस्थापित केला. आता अक्रम यूट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करताना अनेक भाषा टाइप करतो आणि वाचतो.

वयाच्या १० व्या वर्षी अक्रमने एका तासात २० भाषांमध्ये भारताचे राष्ट्रगीत लिहून दुसरा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याला ‘जर्मन यंग टॅलेंट’ अवॉर्डदेखील मिळाला आहे, जिथे तो ७० भाषिक तज्ज्ञांच्या विरोधात स्पर्धेला उभा राहिला. अक्रमने एका टॅलेंट शोमध्ये भाग घेतला आणि त्याला युरोपिय देशात त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील डॅन्यूब इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिष्यवृत्तीवर हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले.

अक्रमने चेन्नईतील अलागप्पा विद्यापीठातून अॅनिमेशनमध्ये बॅचलर पदवी आणि युकेमधील मिल्टन केन्स येथील ओपन युनिव्हर्सिटीमधून इंग्रजी साहित्य आणि भाषाशास्त्रात बॅचलर पदवी मिळवली आहे. त्याने ज्या भाषांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे, त्यापैकी एक तमिळ त्याची आवडती भाषा आहे. कारण तमिळ त्याची मातृभाषा आहे आणि त्याच्या हृदयात या भाषेसाठी विशेष स्थान आहे.