Manjari Jaruhar’s Success Story : दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, पण यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे इतके सोपे नाही. त्यासाठी खूप जास्त मेहनत आणि अभ्यास करावा लागतो. जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन मिळत नाही तेव्हा यूपीएससीसारखी परीक्षा उत्तीर्ण होणे हे एक मोठे आव्हान असते. आज आपण अशाच एका महिलेविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी या आव्हानाचा फक्त सामना केला नाही तर जगासमोर आदर्श निर्माण केला.
भारताची पाचवी आणि बिहारची पहिली महिला आयपीएस मंजरी जारुहार यांची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. महिला आयपीएस मंजरी जारुहार हे फक्त एक नाव नाही तर लाखो महिलांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचा खडतर जीवनप्रवास, जिद्द, चिकाटी आणि त्यांनी प्रत्येक समस्येशी केलेला सामना त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतो.
मंजरी जारुहार यांचे सुरुवातीचे आयुष्य
मंजरी जारुहार यांना अवघ्या १९ व्या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकावं लागलं. त्यावेळी त्यांचे पती आयएफएस (IFS) होते. त्यांनासुद्धा आयुष्यात शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं, पण एक वेळ अशी आली की त्यांना वाटले की त्या फक्त गृहिणी बनून आयुष्य जगणार, पण त्यांनी हार मानली नाही. जेव्हा त्यांनी आयुष्यात पुढे जाण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे पती आणि सासरची लोक त्यांना शिक्षण आणि करिअरमध्ये सहकार्य करत नाहीत. घरगुती जबाबदार्यांमुळे करिअरकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवताच त्यांनी आयुष्याला कलाटणी देणारा एक मोठा निर्णय घेतला आणि सासरच्या लोकांपासून स्वत:ला दूर केले. त्यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या ध्येयावर केंद्रित केले.
मंजरी जारुहार यांचा लग्नानंतरचा करिअर प्रवास
पटना येथील महिला कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी भाषेत पदवी घेतली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि स्वप्नांचा पाठलाग करत यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. १९७४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली. त्या प्रीलिम्स आणि मेन्स उत्तीर्ण झाल्या, पण मुलाखतीत मात्र नापास झाल्या. पण, त्यांनी हार मानली नाही. पुन्हा मेहनत घेतली आणि १९७५ मध्ये त्यांना यूपीएससी परीक्षेत यश मिळाले.
यूपीएससी परीक्षेत मुलाखतीदरम्यान त्यांना बोर्डच्या सदस्यांनी प्रश्न विचारला होता की, तुम्हाला मेयोनिज सॉस बनवता येतो का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांना असा प्रश्न का विचारला; कारण त्यांनी फॉर्ममध्ये जेवण बनवायला आवडते असे लिहिले होते. त्यावेळी या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी स्टेप टू स्टेप रेसिपी सांगितली होती. त्या काळात मेयोनिज भारतात साधारण कुठेही सहज मिळायचे नाही. पण, मंजरी यांनी दिलेल्या उत्तराने ते प्रभावित झाले. त्यानंतर त्यांना पुढे कोणताही प्रश्न विचारला नाही.
निवृत्तीनंतर मंजरी यांनी ‘मॅडम सर’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी आयपीएस अधिकारी म्हणून त्यांचा जीवनप्रवास, संघर्ष आणि चांगले वाईट अनुभव सांगितले आहेत. मंजरी या प्रत्येक महिलांसाठी एक प्रेरणा आहेत, ज्यांना आयुष्यात मोठी उंची गाठायची आहे. इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात अशक्यही शक्य करता येतं, हे मंजरी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.