मेघा जैन ही जयपूरची रहिवासी आहे. २०१२ मध्ये ती स्वत:च्या लग्नाची तयारी करीत असताना तिला व्यवसायाची एक कल्पना सुचली. पाहुण्यांसाठी भेटवस्तू शोधत असताना तिची नजर महागड्या परदेशी सुपरफूड्सवर पडली. त्यामुळे तिला लोकांना असे आरोग्यदायी पदार्थ देण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिने स्वतःची कंपनी ‘केनी डिलाइट्स’ सुरू केली. कोरोना साथीच्या काळात लोकांना निरोगी अन्नाची गरज असल्याने तिच्या व्यवसायाच्या वाढीमध्ये भर पडली. आज मेघा एक यशस्वी उद्योजिका आहे. ती इतर महिलांसाठीही प्रेरणा आहे. चला तर मग मेघा जैन यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ…
अशा प्रकारे सुचली व्यवसायाची कल्पना
मेघा जैनच्या व्यावसायिक प्रवासाची कहाणी २०१२ मध्ये सुरू झाली, जेव्हा ती तिच्या लग्नाची तयारी करत होती. ती पाहुण्यांसाठी काहीतरी वेगळ्या प्रकारची भेटवस्तू शोधत होती. तेव्हा तिची नजर क्रॅनबेरी, ब्लूबेरी व गोजी बेरी यांसारख्या विदेशी सुपरफूड्सवर पडली. हे सुपरफूड्स आरोग्यासाठी खूप चांगले असतात. पण, त्यांची किंमतही खूप जास्त असते. मेघाच्या मनात याच वेळी एका व्यावसायिक कल्पनेने जन्म घेतला. तिने विचार केला की, या सुपरफूड्सचा व्यवसाय का करू नये?
पुण्यातून केले आहे एमबीए
मेघाने २००७ मध्ये पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमधून एमबीए पूर्ण केले. त्याव्यतिरिक्त तिने दक्षिण दिल्ली पॉलिटेक्निकमधून इंटेरियर डिझायनिंगमध्ये डिप्लोमादेखील पूर्ण केला. पण, नोकरी करण्याऐवजी मेघाने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. तिने आपले शिक्षण आणि कौशल्ये वापरून नवीन व्यवसाय सुरू केला.
वेगवेगळ्या देशांमधून आयात केली उत्पादने
तिच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणत, मेघा जैनने थायलंडमधून क्रॅनबेरी व ब्लूबेरी ऑर्डर केल्या. तिने त्यामध्ये चिया सीड्स, क्विनोआ व ब्राझील नट्स यांसारखे अधिक आरोग्यदायी सुपरफूडदेखील जोडले. या सर्व पौष्टिक उत्पादनांचे मिश्रण करून, तिने ते भारतात विकायला सुरुवात केली. अशा प्रकारे, तिची कंपनी ‘केनी डिलाइट्स’ सुरू झाली.
कोरोना काळात व्यवसायाला मिळाली गती
सुरुवातीला व्यवसाय मंद गतीने चालत होता; पण त्यानंतर कोरोनाचा काळ आला. लॉकडाऊनदरम्यान लोक त्यांच्या घरातच बंद होते. यावेळी सर्वांना निरोगी आणि पौष्टिक अन्न हवे होते. इथेच मेघा जैनच्या व्यवसायाला यश मिळायला सुरुवात झाली. लोक ऑनलाइन ऑर्डर देऊ लागले आणि ‘केनी डिलाईट्स’च्या उत्पादनांची मागणी वाढली. आता तिची कंपनी कोट्यवधींचा व्यवसाय करते. मेघाची कहाणी मोठी स्वप्ने पाहणाऱ्या सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. मेघाने केवळ तिचे स्वप्न पूर्णच केले नाही, तर इतर अनेक महिलांसाठी एक आदर्शही निर्माण केला. तिच्या प्रवासातून हे सिद्ध होते की, जर तुमच्यात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही कठोर परिश्रम करण्यास घाबरत नसाल, तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते.