Success story of mohd javed hussain: यश नशिबाने मिळते की मेहनतीने,हा प्रश्न प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्याच्या मनात येतो. झारखंडमधील एका छोट्या शहरातून आलेले आणि आयएएस झालेले मो. जावेद हुसेन यांच्या कथेत या प्रश्नाचे उत्तर सापडते. हा फक्त एक प्रवास नाही, तर दृढनिश्चय, संघर्ष व कठोर परिश्रमाचे एक उत्तम उदाहरण आहे.
अपयशाच्या भीतीने स्वप्नांचा पाठलाग सोडून देणाऱ्यांसाठी त्यांची कहाणी प्रेरणादायी अशी आहे. मो. जावेद हुसेन यांना पलामूचे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त केले गेले. त्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागला; पण त्यांनी कधीही हार मानली नाही. शेवटी त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले. चला, तर मग यानिमित्ताने त्यांच्या या अद्भुत प्रवासाबद्दल जाणून घेऊ…
सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण
मो. जावेद हुसेन हे झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून येतात. त्यांचे वडील वन विभागात मुख्य लिपीक पदावरून निवृत्त झाले आणि आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते; पण त्याची तयारी त्यांनी खूप उशिरा सुरू केली. त्यांनी सीबीएसई बोर्डातून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मॅट्रिकच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले.
त्यानंतर ते बोकारोला गेले आणि चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांची निवड भोपाळमधील एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली, जिथून त्यांनी पदवी पूर्ण केली.
नोकरी आणि भविष्यातील तयारी
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाली; पण ते समाधानी नव्हते. ते गेट परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेले आणि त्यांनी तीनदा प्रयत्न केला. २०१३ मध्ये त्यांनी गेट परीक्षेत १२३ वा आणि भारतीय अभियांत्रिकी सेवांमध्ये २४ वा क्रमांक मिळवला. त्यानंतर ते रेल्वेमध्ये अभियंता म्हणून नोकरीला लागले.
संघर्षांनी भरलेला प्रवास
त्यांचे स्वप्न आयएएस होण्याचे होते म्हणून त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ते २०१४ मध्ये पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षेला बसले आणि मुलाखतीला पोहोचले; पण काही गुणांनी अनुत्तीर्ण झाले. या अपयशामुळे त्यांना हे जाणवले की, योग्य रणनीती वापरून परीक्षा उत्तीर्ण होता येते. तथापि, नोकरीसोबत तयारी करणे कठीण होत चालले होते.
दुसऱ्या प्रयत्नात ते प्राथमिक परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे ते खूप निराश झाले. तिसऱ्या प्रयत्नात ते पुन्हा मुलाखतीला पोहोचले; परंतु त्यांची निवड झाली नाही. चौथ्या प्रयत्नात पुन्हा ते पूर्वपरीक्षेत अनुत्तीर्ण झाले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता.
अखेर मिळाले यश
सलग चार वेळा अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. आपल्या चुका सुधारत त्यांनी एक नवीन रणनीती आखली आणि २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. ते २०१९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी बनले आणि त्यांना २८० वी रँक मिळाली. हा त्यांच्यासाठी खूप भावनिक क्षण होता. कारण- त्यांच्या बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले होते.
प्रशासकीय प्रवास
आयएएस झाल्यानंतर त्यांनी लबासनामध्ये प्रशिक्षण घेतले. त्यांची पहिली फील्ड पोस्टिंग चाईबासा येथे होती. त्यांची पहिली स्वतंत्र नियुक्ती रामगड येथे एसडीएम म्हणून होती, जिथे त्यांनी सुमारे दोन वर्षे काम केले. त्यानंतर त्यांना पलामूच्या मेदिनीनगर महानगरपालिकेत महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.
तरुणांसाठी संदेश
मो. जावेद हुसेन म्हणतात की, यशासाठी समर्पण आवश्यक असते. जर तुम्ही कोणत्याही ध्येयासाठी पूर्ण प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाने तयारी केली, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. अपयशाला घाबरण्याऐवजी त्यातून शिकले पाहिजे. वारंवार अपयश येऊनही हार मानू नका. कारण- कठोर परिश्रम शेवटी गोड फळ देतात.