Success Story Of Nikunj Vasoya : खिजाडिया हे गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे, जिथे कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबात वाढलेल्या एका मुलाला स्वयंपाकाची प्रचंड आवड होती. तो अनेकदा आईला स्वयंपाकघरात मदतही करायचा. शेती करत असल्याने कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित होते. अशा परिस्थितीत मुलाने विचार केला की, स्वयंपाकाच्या या छंदाचे करिअरमध्ये रूपांतर केलं तर? या विचारात अनेक महिने निघून गेले, पण अखेर तो दिवस आला… ज्याचा त्या मुलाने कधीही विचार केला नाही. कारण एके दिवशी हा मुलगा इतका लोकप्रिय शेफ बनला की, या मुलाला मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात जेवण बनवण्याची संधी मिळाली; ज्याची जगातील सर्वात महागड्या लग्नांमध्ये गणना केली जाते. चला तर जाणून घेऊयात त्याची यशोगाथा (Success Story)…
तर या लोकप्रिय शेफचे नाव निकुंज वसोया असे आहे, ज्यांचा जन्म जामनगरमध्ये झाला. निकुंज सध्याच्या घडीला काठियावाडी फूड स्पेशलिस्ट आहेत.
निकुंज वसोया यांचा असा विश्वास आहे की, श्रीमंत असो किंवा गरीब, चांगले जेवण सर्वांना आनंदी करते. २० वर्षांपूर्वी याच विचारातून सुरू झालेल्या स्वयंपाक करण्याच्या त्यांच्या प्रवासाला आता मोठ्या करिअरचे स्वरूप (Success Story) प्राप्त झाले आहे.
ही गोष्ट २०१३ मध्ये सुरू झाली होती, जेव्हा निकुंज वसोया सीएस होण्यासाठी तयारी करत होते. या वेळी त्यांना जाणवले की, त्यांचा खरा आनंद स्वयंपाक करण्यातच आहे. त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच स्वतःचा कुकिंग शो असावा असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यावेळी त्यांना सुरुवात कशी करावी हे कळत नव्हते. त्यानंतर त्यांना यूट्यूबवर स्वतःचे चॅनेल सुरू करण्याची कल्पना सुचली. तेव्हा त्यांनी ‘क्रेझी फॉर इंडियन फूड’ असे नाव देऊन स्वतःचे चॅनेल सुरू केले.
१२ वेळा अंबानी कुटुंबासाठी काठीयावाडी जेवण बनवले :
निकुंज वसोया यांनी त्यांच्या शेतातून ताज्या भाज्या तोडून, त्या वापरून पारंपरिक काठियावाडी पदार्थ बनवायला सुरुवात केली आणि त्याचे व्हिडीओ त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले. त्यामुळे चॅनेलला हळूहळू गती मिळू लागली. आज निकुंज यांच्या चॅनेलचे ५.९ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांचा सर्वात लोकप्रिय व्हिडीओ ९.१ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. तर त्यांच्या अस्सल काठियावाडी जेवणाचे अंबानी कुटुंबही चाहते झाले. त्यांना न्यू इयर पार्टी आणि अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या वंतारा येथे लग्नाआधीच्या समारंभासाठी (प्री-वेडिंग) देखील स्वयंपाक करण्यासाठी बोलावण्यात आले होते.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, निकुंज वसोया आता ३५ वर्षांचे आहेत. अंबानी कुटुंबाबरोबरचा त्यांचा प्रवास न्यू इयरच्या डिनरने कसा सुरू झाला हे सांगताना ते म्हणाले की, “नीता अंबानी जेवणाने एवढ्या खूश झाल्या की त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले. तेव्हापासून मी १२ वेळा कुटुंबासाठी काठीयावाडी जेवण बनवले आहे.” एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या निकुंज वसोयाने आपल्या स्वयंपाकाच्या आवडीला मेहनतीची जोड दिली आणि आपलं यश (Success Story) संपादन केले. अशाप्रकारे “कधीही हार मानू नका, मोठे स्वप्न पाहा, त्यावर काम करा आणि ते पूर्ण होईल असा विश्वास ठेवा”; असे उदाहरण त्यांनी आज सगळ्यांसमोर ठेवले आहे.