Success story of Nitin seth: स्वप्न आपोआप सत्यात उतरत नाही. त्यासाठी घाम गाळावा लागतो, जिद्द आणि मेहनत लागते. नितीन सेठ यांची प्रेरणादायी कथा याचा धडधडीत पुरावा आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील त्यांच्या विनम्र सुरुवातीपासून ते यशस्वी उद्योजक बनण्यापर्यंतचा नितीन सेठ यांचा प्रवास एखाद्या परीकथेतल्या गोष्टीसारखा वाटतो. नितीन यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांचे मार्गदर्शक तत्त्व नेहमीच सोपे होते : “लहान ध्येयं ठेवा आणि प्रगती करत राहा.” स्टेप बाय स्टेप, नितीन यांच्या मेहनतीमुळे आज त्यांची हजार कोटींहून अधिक किमतीची कंपनी तयार झाली आहे.
नितीन सेठ हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झाले तर, सेठ यांचे वडील वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) होते आणि आई घरचा कारभार सांभाळायची. लहानपणापासूनच नितीन यांनी त्यांच्या अभ्यासात प्रावीण्य मिळवले आणि आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई आयआयटीत प्रवेश मिळवला. पदवी शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांची कॅम्पस रिक्रुटमेंटमधून निवड झाली. आयआयटीमध्ये शिकणे व चांगली नोकरी मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते आणि नितीन यांचे हे स्वप्न लवकर पूर्ण झाले. मात्र, नोकरी करण्यापेक्षा काहीतरी करून दाखवण्याची तीव्र इच्छा त्यांच्यात होती. स्वाभाविकत: या ठिणगीचे अखेर आगीत रूपांतर झाले आणि त्यांनी आपली नोकरी सोडून काही मित्रांसह स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
नितीन सेठ यांनी सांगितले की, एका सामान्य समस्येवरून त्यांना त्यांच्या व्यवसायाची कल्पना सुचली. त्यांनी शेअर केले की, आतापर्यंत बहुतेक व्यावसायिकांकडून ग्राहकांशी एक तर फोन, एसएमएस किंवा कॉलद्वारे संभाषण केले जात होते. तथापि, ही प्रक्रिया मॅन्युअल, वेळ घेणारी आणि खर्चीक होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांसाठी एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे लॉयल्टी प्रोग्राम चालवण्यास सुरुवात केली. तथापि, आव्हान हे होते की, या किरकोळ विक्रेत्यांकडे त्यांच्या ग्राहकांचा संघटित डेटाबेस नव्हता. याचे निराकरण करण्यासाठी, त्यांनी क्लाउडमध्ये डेटा संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि सेल्सफोर्स (Salesforce) व झोहो (Zoho) यांच्याशी भागीदारी केली.
एसएमएस मॅजिक हा त्यांचा दुसरा स्टार्टअप असल्याचे त्यांनी नमूद केले. याआधी त्यांनी मुंबईत त्यांच्या IIT बॉम्बे सहकाऱ्यांसोबत आणखी एका उपक्रमावर काम केले होते, जिथे ते Airtel आणि इतर दूरसंचार वाहकांच्या सहकार्याने स्थान-आधारित (location-based) सेवा तयार करीत होते.
नितीन यांनी सांगितले की, दिल्लीत मोठे झाल्यानंतर आणि मुंबईत प्रवास सुरू केल्यानंतर त्यांनी ग्राहकांच्या वर्तनाचा बारकाईने अभ्यास केला. किरकोळ विक्रेत्यांशी संवाद होत राहिल्याने त्यांना त्यांची मानसिकता आणि आव्हाने कळली. भारताचा वैविध्यपूर्ण भूगोल आणि मोठी लोकसंख्या लक्षात घेता, त्यांनी एसएमएस मोहिमेमध्ये प्रयोग केले आणि त्यांना मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे त्यांचा दृष्टिकोन सुधारला. आज त्यांनी जागतिक कॅलिबरचे प्रॉडक्ट तयार केले आहे, जे CRM सह एकत्रित करण्यात आले आहे आणि यूएसए, यूके व ऑस्ट्रेलियामध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहे.
नितीन सांगतात की, प्रत्येक व्यावसायिक संकल्पनेला आकार देण्यासाठी निधीची गरज असते. ‘न्यूज 18 हिंदी’च्या अहवालानुसार, त्यांनी त्यांच्या मित्र आणि कुटुंबाकडून सुमारे पाच लाख रुपये जमा केले; ज्यामुळे त्यांना एसएमएस-आधारित लॉयल्टी प्रोग्रामचा पहिला नमुना तयार करण्यास मदत झाली. गुंतवणूकदारांवर अवलंबून न राहता, त्यांनी स्वत:कडील संसाधनांचा वापर केला. त्यांना पहिली आर्थिक मदत बँकेकडून कर्जाच्या रूपाने मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
नितिन सेठ यांचे म्हणणे आहे की, एसएमएस मॅजिक (SMS Magic) आणि त्यांचा नवीन ब्रॅण्ड आणि प्रॉडक्ट, सेवा पुरवठादारांना जसे की डॉक्टर, शैक्षणिक संस्था व वित्तीय कंपन्यांना इंटरअॅक्टिव्ह मेसेजिंगद्वारे मदत करतात. हे सेवा पुरवठादार ग्राहकांशी विविध टप्प्यांवर थेट संवाद साधू शकतात, जसे की चौकशी ते प्रवेश, आणि नंतरची मदत. हे संवाद ते सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या चॅनेल्सद्वारे करतात, जसे की SMS, ईमेल, RCS, व्हॉट्सअॅप आणि आता व्हॉइस बॉट्स. त्यांचे प्रॉडक्ट आता डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट रिमाइंडर्स आणि कर्ज अर्जाच्या सूचना (loan application notifications) यांसारख्या फीचर्ससह उपलब्ध आहे.
नितीन सेठ यांनी शेअर केले की, १० वर्षांपूर्वी त्यांनी मित्रांच्या मदतीने सुरू केलेला प्रवास आता हजार कोटी रुपयांच्या व्यवसायात बदलला आहे. त्यांनी यूएस मार्केटमध्ये मजबूत उपस्थिती प्रस्थापित केली आहे आणि आता या मार्केटमध्ये खोलवर विस्तार करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. AI-सक्षम संभाषणांमधून ग्राहकांचा अनुभव वाढवणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या उत्पादनाच्या मदतीने डॉक्टरांना अतिरिक्त कर्मचारी किंवा सहायकांची आवश्यकता भासणार नाही आणि एसएमएस, व्हॉट्सॲप, व्हॉइस व ईमेल चॅनेलद्वारे रुग्णांना सेवा देता येईल. रुग्ण यामधून, केव्हाही डॉक्टरांशी संपर्क साधण्यास सक्षम असतील.