Success Story of Kavita: कविताचा जन्म तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्यातील एका दुर्गम गावात झाला. त्यांच्या कुटुंबात सात जण आहेत. उत्पन्नासाठी त्यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून होते. अभ्यास साहित्याचा अभाव, स्टेशनरी आणि मुख्य म्हणजे स्वयं-अभ्यासासाठी वेळ नसणे यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतानाही कविता आपला अभ्यास सुरू ठेवण्यासाठी ठाम होती.
२०१४ मध्ये जेव्हा तिने सहाव्या इयत्तेत प्रवेश केला, तेव्हा कविता रूम टू रीडच्या मुलींच्या शिक्षण कार्यक्रमात सामील झाली. त्यावेळी कौटुंबिक परंपरा आणि घरापासून शाळेचे अंतर लांब, यामुळे कविताच्या वडिलांचा तिच्या शिक्षणासाठी विरोध होता. तथापि, कविता तिच्या शिकण्याच्या आवडीवर तटस्थ राहिली आणि अडथळे असतानाही तिच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही याची तिने काळजी घेतली.
स्वभावाने इंट्रोवर्ट असणाऱ्या कविताने शैक्षणिक आणि लाईफ स्कील्स ॲक्टिव्हिटीजमध्ये सक्रियपणे भाग घेतला. पहिली पिढी शिकणारी असल्याने कविताला अतिरिक्त आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु रूम टू रीडच्या सामाजिक कार्यकर्त्या ममताच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे कविताने हळूहळू आत्मविश्वास वाढवला. पण, ती नववीत असताना तिच्या वडिलांना करोना झाला आणि घरची परिस्थिती बिकट झाली. तिने शाळा सोडून कामाला लागावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती, पण कविताने हार मानली नाही. तिने शिक्षिकेची मदत घेतली आणि पालकांना समजावून सांगितले की ती शिकेल आणि घरही सांभाळेल.
तिच्या मेहनतीला यश प्राप्त झालं आणि ती दहावीत प्रथम आली. शाळा संपल्यानंतर कविता कॉलेजला जाऊ लागली आणि तिच्या कुटुंबालाही मदत करू लागली. तिचे लग्न लवकर व्हावे अशी सगळ्यांची इच्छा होती, पण कविताने आधी करिअर करायचे आणि मग लग्न करायचे, असे मनाशी ठरवले होते. कॉलेजच्या पहिल्या वर्षात ती राज्य सरकारच्या SHE टीमने खूप प्रभावित झाली होती. या पोलिस दलाचे काम महिलांचे संरक्षण करणे हे होते. कविताने विचार केला, तीसुद्धा पोलिस बनून लोकांना मदत का करत नाही? त्यानंतर तिने पोलिस होण्याची तयारी सुरू केली.
कविताने खूप कष्ट केले आणि पोलिस होण्याचे स्वप्न पाहिले. तिने समाजात मुलींच्या शिक्षणासाठीही काम केले आणि मुली आणि मुले समान आहेत हे लोकांना पटवून दिले. शेवटी तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तिला पोलिस कॉन्स्टेबल बनण्याची संधी मिळाली. कविता आजही तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहे. पोलिस प्रशिक्षणासोबतच तिचा अभ्यास सुरू ठेवत, प्रत्येक मुलीला समान संधी मिळतील असे जग तिला निर्माण करायचे आहे.