Success Story Premsukh Delu : आपल्यातील अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. सरकारी नोकरी असेल, तर पुढील भविष्यासाठी सेव्हिंग, प्लॅनिंग करता येते, असा विचार आपल्यातील अनेकांच्या डोक्यात असतो. त्यातही वरिष्ठ सरकारी अधिकारी पद मिळवायचे असेल, तर त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. त्या विशिष्ट परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागतो, तासन् तास सराव करावा लागतो. त्यामुळे अनेक जण कनिष्ठ पदाची का होईना सरकारी नोकरी मिळाली की, मग अभ्यास करण्याचा कंटाळा करून, मोठी महत्त्वाकांक्षा विसरतात. परंतु, एका आयपीएस अधिकाऱ्यानं अभ्यासाच्या कंटाळ्यावर फुली मारली. तर आज आपण याच आयपीएस अधिकऱ्याची गोष्ट (Success Story ) या लेखातून जाणून घेणार आहोत…
राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील नोखा तहसीलमधील रायसर नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात प्रेमसुख देलू यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शेती व उंटाची गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. सुरुवातीच्या काळात प्रेमसुख वडिलांबरोबर शेतात गाईला चरवण्यासाठी त्यांना मदत करायचे आणि अभ्यासाचा समतोलसुद्धा राखायचे. त्यांनी लहानपणी गरिबी अगदीच जवळून पाहिली होती. अशा अनेक आर्थिक अडचणी असूनही त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले. कारण- आपले लक्ष्य पूर्ण केल्याने आपण कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढू शकतो हे त्यांना वेळीच कळले होते.
प्रेमसुख यांचे पालक सरकारी शाळेत शिकले होते. पण, त्यांच्या मोठ्या बहिणीला परिस्थितीअभावी कधीही शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून प्रेमसुख यांनी आपल्या कुटुंबाला चांगले जीवनमान देण्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याचे लक्ष्य ठेवले. प्रेमसुख यांनी २०१० मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पटवारी भरती परीक्षा (Patwari recruitment exam) उत्तीर्ण करून यशाचा पहिला टप्पा गाठला. त्यामुळे त्यांना पटवारी, स्थानिक सरकारी जमीन अभिलेख अधिकारी बनण्याची परवानगी मिळाली. मात्र, ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पटवारी म्हणून काम करतानाच त्यांनी आपला अभ्यासही चालू ठेवला होता.
सहा वर्षांत यूपीएससीसह केल्या १२ सरकारी नोकऱ्या :
त्यांनी १०वीपर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर बिकानेरच्या सरकारी डुंगर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तेथून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी केवळ अभ्यासातच प्रावीण्य मिळवले नाही, तर ते सुवर्णपदक विजेताही ठरले होते. त्यानंतर ते इतिहास विषयातील यूजीसी नेट ( UGC NET) आणि जेआरएफ (JRF) या परीक्षादेखील उत्तीर्ण झाले.
सहा वर्षांत प्रेमसुख यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासह जवळजवळ १२ सरकारी नोकऱ्या केल्या. पटवारी म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी राजस्थान ग्रामसेवक परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला. मग नंतर राजस्थान पोलिसांत उपनिरीक्षक पदासाठी त्यांची निवड झाली. पण, त्याऐवजी त्यांनी सहायक तुरुंगाधिकारी म्हणून काम करणे पसंत केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना तहसीलदार, महाविद्यालयीन व्याख्याता, शालेय व्याख्याता अशा अनेक पदांवर काम करता आले आणि शेवटी त्यांचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण (Success Story) झाले. नागरी सेवा परीक्षेत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात १७० वा क्रमांक मिळवला.
आयपीएस प्रेमसुख देलू यांचा गाई चरवण्यापासून ते आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास लवचिकता, दृढनिश्चय व शिक्षणाच्या सामर्थ्याची प्रेरणादायी कथा ( Success Story ) आहे. प्रेमसुख यांची जीवनकहाणी ही माणूस संकटांवर मात करून कठोर परिश्रम, चिकाटीने यश कसे मिळवू शकतो याचे ज्वलंत उदाहरण आहे, असे म्हणायला हरकत नाही.