Success Story Of Priyanka Saini : आपल्यातील प्रत्येक जण जीवनात अनेक समस्यांना सामोरा जात असतो. समस्यांना सामोरे जाताना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम केल्यास यश संपादन करता येते. तसेच त्यामुळे जीवनसुद्धा बदलू शकते. ही अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे सहारनपूरमधील नवीन नगर येथील रहिवासी प्रियांका सैनीची. २०१३ मध्ये प्रियांकाचे नीरज सैनी याच्याशी लग्न झाले. आयटी क्षेत्रात काम करणारा आणि एमबीए पदवीधर असलेला तिचा नवरा कुटुंबाचा खर्च भागवीत होता. प्रियांकानेसुद्धा एमए पूर्ण केले होते आणि ती गृहिणी म्हणून जीवन जगत होती.

पण, कोविड-१९ महामारीच्या काळात नीरजची अचानक नोकरी गेल्याने सर्व काही बदलले. या अनपेक्षित परिस्थितीमुळे कुटुंबासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. वाढता खर्च पाहता, प्रियांकानं पुढे येऊन तिच्या कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. तिच्या सासऱ्यांच्या सल्ल्यानं, तिला घरातूनच मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. हळद, तिखट आणि धणे हे मसाले प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात लागणाऱ्या आवश्यक वस्तू आहेत. म्हणून तिने कच्चे मसाले खरेदी करण्यासाठी स्थानिक शेतकरी आणि बाजारपेठांमध्ये संपर्क साधला आणि ते घरीच दळण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तिने ते विकण्याससुद्धा सुरुवात केली.

छोट्याश्या प्रयत्नाचे यशस्वी व्यवसायात झाले रूपांतर (Success Story)

कुटुंबाला आधार देण्यासाठी एका छोट्याशा प्रयत्नातून सुरू झालेला हा व्यवसाय आता यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाला आहे. प्रियांका आता तिचे घरगुती मसाले ऑफलाइन आणि ऑनलाइन शेकडो ग्राहकांना विकते. तिच्या उत्पादनांमध्ये हळद, लाल मिरची, धणे, गरम मसाला, काळे मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर, बडीशेप पावडर, जिरे पावडर व आमचूर (आंबा पावडर) यांचा समावेश आहे. ग्राहकांना तिने बनविलेल्या मसाल्यांची नैसर्गिक चव आणि शुद्धता आवडते. तिच्या म्हणण्यानुसार ग्राहकाने एकदा मसाले वापरून पाहिल्यानंतर बरेच जण त्यांची पुन्हा पुन्हा खरेदी करतात.

तसेच प्रियांका याचीसुद्धा खात्री करून घेते की, तिच्या किमती बाजारभावाशी जुळतील आणि तिचे मसाले पूर्णपणे भेसळमुक्त असतील. तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक छोटा मसाल्याचा कारखाना सुरू करण्याची योजना ती आखली असून, ती महिलांना रोजगारसुद्धा देणार आहे. नवरा आणि सासऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे, प्रियांकाने गृहिणी ते यशस्वी उद्योजक असा प्रवास केला, जो प्रत्येक गृहिणीसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.