Success Story Of Raj Navani : सातत्यानं वाढत चाललेल्या महागाईमुळे अनेक जण छोट्या-छोट्या गोष्टींमधून पैसे कमावण्याचा विचार करत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे एका नोकरीच्या पगारावर लोकांना घरखर्च भागवणे व मुलं-घर सांभाळून ९ ते ६ नोकरी करणे अनेकांना शक्य होत नाही. यामुळे लोकं स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असतात. तसेच हा व्यवसाय एक दिवस एवढा मोठा होईल की प्रसिद्ध माणसंही आपल्याकडून वस्तू खरेदी करतील असं स्वप्न आपण कुठेतरी उराशी बाळगळलेलं असतं.
तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने फॅशन इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण करून लहानसं दुकान सुरू केलं; तर आज त्याचा ब्रँड अनेक सेलिब्रेटींच्या पसंतीस उतरतो आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुणाची ही यशोगाथा (Success Story) व्यवसायात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या सर्व नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. कोण आहे ही व्यक्ती? कसा सुरू झाला तिचा हा प्रवास? लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…
‘सॉरी मॅडम’ नावाचे कपड्यांचे दुकान :
तर राज नवानी असे या व्यक्तीचे नाव आहे; जे मध्य प्रदेशातील दमोह या छोट्या शहरात राहतात. जीवशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर, राज यांनी आपल्या वडिलांच्या ‘जय जवान जय किसान’ या कपड्यांच्या दुकानापासून प्रेरित होऊन वयाच्या २३ व्या वर्षी व्यवसायाच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास १९९५ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांनी पाच लाखांचे कर्ज घेऊन ‘सॉरी मॅडम’ नावाचे लहान कपड्यांचे दुकान सुरू केले. त्यांच्या ‘सॉरी मॅडम’ या स्टोअरने शहरात झपाट्याने लोकप्रियता मिळवली. हळूहळू राज नवानी यांनी फॅशन इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आज त्यांचा ‘नोस्ट्रम’ (Nostrum) हा ब्रँड अनेक नामवंत सेलिब्रिटींच्याही पसंतीस उतरतो आहे.
कठोर परिश्रमाने राज नवानी यांनी त्यांच्या ‘सॉरी मॅडम’ दुकानाचे आज ‘नोस्ट्रम फॅशन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत रूपांतर केलं आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांच्या कंपनीची उलाढाल १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. आता येत्या दोन वर्षांत ते व्यवसाय ५०० कोटींवर घेऊन जाण्याचे लक्ष्य ठेवून आहेत. २५० हून अधिक लोकांना रोजगार देणारा त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. ‘नोस्ट्रम’ उत्पादने आता देशभरात १,५०० मल्टी-ब्रँड आउटलेट आणि १०० पेक्षा जास्त शॉप-इन-शॉप स्थानांवर उपलब्ध आहेत. फॅशन जगतात आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी राज नवानी यांचा प्रवास (Success Story) खूपच प्रेरणादायी आहे.