Rupal Rana Success Story: रुपल राणा ही उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरौत गावची रहिवासी आहे. येत्या अनेक वर्षांपासून तिचे नाव यूपीएससीच्या सर्वात संघर्षपूर्ण कहाण्यांमध्ये समाविष्ट केले जाईल. जेव्हा रुपल राणा यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती तेव्हा तिच्या आईचे निधन झाले, पण तिने हिंमत गमावली नाही. वडिलांच्या प्रोत्साहनाने आणि स्वतःच्या मेहनतीने तिने यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी बनली.

दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षेला बसतात. परंतु, त्यापैकी फक्त काही जण त्यात यशस्वी होऊ शकतात आणि स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव मोठं करू शकतात. रुपल राणाची कहाणीदेखील अशाच प्रेरक कथांपैकी एक आहे. यूपीएससी परीक्षेपर्यंतचा तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या काळात तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे तिच्या आईचा मृत्यू.

वडील दिल्ली पोलिसांत एएसआय

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरौत गावातील रहिवासी रुपल राणा ही दिल्ली पोलिसांतील सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) जसवीर राणा यांची मुलगी आहे. तिचे कुटुंब दिल्लीतील लाजपत नगर पोलिस कॉलनीत राहते. रुपलने बागपत येथील जेपी पब्लिक स्कूलमधून दहावीत 10 CGPA मिळवले होते. यानंतर तिने राजस्थानातील पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथून अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमधून बी.एसस्सी केले आणि विद्यापीठात टॉपर ठरली.

दोन वेळा यूपीएससी परीक्षेत नापास

रुपल राणासाठी यूपीएससीचा प्रवास सोपा नव्हता. देशातील सर्वोच्च सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तिने खूप कष्ट केले, तरीही ती दोनदा अपयशी ठरली. तथापि, तिने आशा सोडली नाही आणि अपयशी ठरल्यानंतरही तिने दुप्पट मेहनत घेऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि शेवटी त्यात यश मिळवले. या काळात रुपल राणाच्या पालकांनी तिला खूप साथ दिली. ती तिच्या यशाचे श्रेय तिचे वडील आणि दिवंगत आई अंजू राणा यांना देते.

निकालापूर्वीच आईचा मृत्यू

रुपल राणाची आई अंजू यांची इच्छा होती की, यूपीएससी परीक्षेत यश मिळवून त्यांच्या मुलीने कुटुंबाचे नाव उंचवायचे होते. त्यांच्या प्रेरणेमुळे, रुपलने २०२३ मध्ये यूपीएससी सीएसई परीक्षेसाठी तिसरा प्रयत्न केला. पण, या परीक्षेची तयारी करत असतानाच त्यांची आई गंभीर आजारी पडली. त्यांची काळजी घेत रुपल परीक्षेची तयारी करत राहिली आणि यावेळी ती यशस्वी झाली. तथापि, यूपीएससीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच तिच्या आईचे निधन झाले.

रुपल राणा ही २०२४ च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. २०२३ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत तिने २६ वा क्रमांक मिळवला.