Success Story Of Sandeep Jangra : आतापर्यंत तुम्ही अनेक उद्योजकांच्या गोष्टी ऐकल्या असतील. त्यामध्ये काही जण छंद म्हणून, तर अनेक जण पोटापाण्यासाठी व्यवसाय करीत असतात. पण, आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत की, ज्यांनी अपयशाच्या मालिकेला कंटाळून रुची नसलेल्या क्षेत्रात व्यवसाय सुरू केला आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी दाखवली. महिन्याला ९,२०० मिळविण्यापासून ते करोडोंची उलाढाल असलेला व्यवसाय चालविण्यापर्यंतचा संदीप जांगड यांचा प्रवास म्हणजे कठोर परिश्रमाची कथा आहे. त्यांच्या पिझ्झा गॅलेरिया या कंपनीची आता भारतभरात ८० पेक्षा जास्त आउटलेट आहेत. पण, त्यांनी मिळविलेल्या यशाचा मार्ग निश्चितच सोपा नव्हता. तर आज आपण त्यांची प्रेरणादायी गोष्ट (Success Story) जाणून घेणार आहोत.

संदीप जांगड हे मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील गोहाना परिसरातील रहिवासी आहेत. संदीप यांच्या शैक्षणिक जीवनात अनेक अडथळे आले. त्यांनी बी.टेक. प्रोग्राममध्ये प्रवेश घेतल्यानंतर उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. वर्षानुवर्षे त्यांनी हे अपयश कुटुंबापासून लपवून ठेवले. जेव्हा सत्य समोर आले तेव्हा मात्र त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. त्यांना रुची नसलेल्या मार्गावर जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा लागला.

हेही वाचा…Success Story : इस्रोचा ड्रीम जॉब सोडून सुरू केला टॅक्सीचा व्यवसाय; वाचा यशस्वी उद्योजक उथया कुमार यांचा प्रवास

आयडिया कामाला आली आणि दुकानात गर्दी जमली…

विविध कल्पनांचा विचार केल्यानंतर संदीप यांनी गोहाना, हरियाणा येथे पिझ्झा आउटलेट उघडण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी रोहतकमधील एका गुरूकडून पिझ्झा बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अभ्यासक्रमासाठी त्यांना पाच लाख रुपये देण्यात आले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना आर्थिक मदत केली. त्यांच्या आई, भावाने त्यांना व्यवसाय (Success Story) सुरू करण्यासाठी मदतीचा भाग म्हणून बचत कशी करावी याबाबत योगदान दिले. त्यानंतर अखेर २०१५ मध्ये पिझ्झा गॅलेरिया असे नाव त्यांनी आपल्या दुकानाला दिले. वर्ड-ऑफ-माउथ मार्केटिंग आणि ट्रायल टेस्टिंगद्वारे त्यांना त्वरित लोकप्रियता मिळाली. संदीप यांची आयडिया कामाला आली आणि दुकानात गर्दी जमू लागली.

संदीप यांच्या व्यवसाय जसजसा वाढत गेला तेव्हा २०१७ पर्यंत संदीप यांनी त्यांचा बालपणीचा मित्र ईशान चुगला याला आपल्याबरोबर व्यवसायात घेतले. आज पिझ्झा गॅलेरिया पास्ता, सँडविच, बर्गर यांसारख्या इतर विविध मेनू आयटमसह दररोज २०,००० पेक्षा जास्त पिझ्झाची विक्री करतो आहे. देशभर गाजलेल्या ‘शार्क टँक’मध्येसुद्धा त्यांनी भाग घेतला; पण तिथे त्यांना आर्थिक साह्य मिळालं नसलं तरीही २०२३-२४ मध्ये त्यांनी १५ कोटींच्या कोटींच्या उलाढालीसह त्यांचा व्यवसाय वाढवला. संदीप यांची कथा (Success Story) हे स्पष्ट करते की, यशासाठी नेहमीच पारंपरिक शिक्षण किंवा मोठ्या प्रारंभिक भांडवलाची आवश्यकता नसते. समर्पण, कठोर परिश्रम, प्रियजनांच्या पाठिंब्याने अगदी अपारंपरिक मार्गदेखील उल्लेखनीय परिणामांना कारणीभूत ठरू शकतात.