Success Story Of Sarvesh Mehtani In Marathi : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणजे काहीतरी अवघड असल्याची भीती अनेकांमध्ये दिसून येते. कारण- आयआयटी-जेईई (IIT-JEE) ही भारतातील जागतिक स्तरावरची सर्वांत आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहे. आयआयटीमध्ये जागा मिळविण्याच्या आशेने भारतभरातील हजारो विद्यार्थी दरवर्षी आयआयटी-जेईईसाठी प्रयत्न करतात. पण, या परीक्षेच्या तयारीमध्ये प्रचंड मेहनत, समर्पण असते. म्हणून काही मोजके विद्यार्थी कठोर परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्याने २०१७ मध्ये जेईई (ॲडव्हान्स्ड) मध्ये टॉप केले होते आणि त्याला ३३९ गुण मिळाले आहेत.

सर्वेश मेहतानी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मूळच्या चंदिगडमधील सर्वेशने २०२१ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून संगणक विज्ञान, अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली आहे. सध्या सर्वेश मेहतानी क्वांटिटेटिव्ह ट्रेडर म्हणून काम करीत आहे.

आयकर विभागातील अधिकारी व सर्वेशचे वडील परवेश मेहतानी म्हणाले की, स्पर्धात्मक परीक्षेत टॉप १० मध्ये येण्याचे त्याचे ध्येय होते. बॅडमिंटन खेळणे, संगीत ऐकणे, टीव्हीवर व्यंगचित्रे पाहणे हे त्याचे आवडते छंद आहेत. सर्वेश मेहतानी याची आई राजबाला, हरियाणा सरकारच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागात काम करते. त्या लेकाच्या यशाबद्दल म्हणतात की, सर्वेश मेहतानी याने अभ्यासाला कधी ओझे मानले नाही.

हेही वाचा…Success Story Of Tathagat Avatar Tulsi : एकेकाळी चाइल्ड प्रॉडिजी म्हणून होती ओळख; पण आज आहेत… वाचा तथागत अवतार तुलसी यांची गोष्ट

सर्वेशने JEE परीक्षेत टॉप रँक मिळवला

सर्वेश मेहतानीने बारावीच्या बोर्ड परीक्षेत ९५.४ टक्के गुण मिळवले आणि १० वीत सीजीपीए मिळवले. जेईई ॲडव्हान्स परीक्षा २०१७ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सर्वेश मेहतानी दररोज तब्बल ५-६ तास अभ्यास करायचा. सुटीच्या दिवशी तो ८ ते १० तास अभ्यास करायचा. असे करून, त्याने जेईई ॲडव्हान्समध्ये ३६६ पैकी ३३९ गुण मिळविले.

सर्वेशने JEE परीक्षेत टॉप रँक मिळविल्यानंतर त्याने भारतातील सर्वांत प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या IIT बॉम्बेमध्ये संगणक विज्ञानात B.Tech चा अभ्यास केला. पण, त्याच्या शैक्षणिक प्रवासात तो थांबून राहिला नाही. सतत शिकत राहणे, अनुभव घेणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवून, सर्वेश सध्या एक क्वांटिटेटिव्ह ट्रेडर म्हणून काम करीत आहे, जो आर्थिक डेरिव्हेटिव्हजच्या व्यापारासाठी उच्च-वारंवारता धोरणे विकसित करतो.