Success Story Of Shubham Kumar : शिक्षण क्षेत्रात अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कहाण्या खरोखरच प्रेरणादायी आहेत. कारण- तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक आव्हानामधून ती व्यक्ती जीवनातील महत्त्वाचे धडे शिकत पुढे गेलेली असते. बिहारच्या कटिहार येथील शुभम कुमार (Shubham Kumar) यांच्या यशामागेसुद्धा खरोखरच एक प्रेरणादायी कहाणी आहे. तर, कोण आहे शुभम कुमार चला जाणून घेऊ…
शुभम कुमार हा भारतीय प्रशासकीय (IAS) अधिकारी २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत प्रभावी अशी अखिल भारतीय रँक (AIR) १ मिळवून उत्तीर्ण झाला. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील कुम्हारी कडवा हे त्याचे गाव आहे. त्याचा आयुष्यातील बहुतांश काळ बिहारच्या छोट्याशा गावात गेला. त्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण गावातील शाळेतूनच घेतले; पण त्याने माध्यमिक शिक्षण पूर्णियाच्या परोरा येथील विद्या विहार निवासी शाळेतून पूर्ण केले. त्याचे उर्वरित वरिष्ठ माध्यमिक शिक्षण झारखंडमधील बोकारो येथील चिन्मय विद्यालयातून पूर्ण झाले.
अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी, शुभम कुमारने प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आणि २१९ वा क्रमांक मिळवला. पुढे त्याने प्रतिष्ठित आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश मिळवला आणि सिव्हिल इंजिनियरिंगचा अभ्यास केला. नंतर त्याने मे २०१७ मध्ये इंडियाना येथील वेस्ट लाफायेट येथील पर्ड्यू विद्यापीठात उन्हाळी संशोधन इंटर्न (summer research intern) म्हणून काम सुरू केले.
यूपीएससी एससीईच्या परीक्षेत तो अव्वल ठरला (Success Story)
२०१८ मध्ये त्याने यूपीएससी एससीईसाठी पहिला प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. २०१९ मध्ये,त्याने दुसऱ्यांदा यूपीएससी एससीई परीक्षेत २९० वा क्रमांक मिळवला आणि भारतीय संरक्षण लेखा सेवा (IDAS)मध्ये त्याची निवड झाली. नॅशनल अकादमी ऑफ डिफेन्स फायनान्शियल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (NADFM) मध्ये IDAS प्रशिक्षण घेत असताना त्याने तिसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि २०२० मध्ये त्या यूपीएससी एससीईच्या परीक्षेत तो अव्वल ठरला.