Success Story of Sidhi Garg: नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कधीच सोपे नसते आणि जर ती व्यक्ती आयटी इंजिनिअर असेल तर खूपच कठीण. पण, जर दृढनिश्चय आणि धाडस असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात. जयपूरच्या सिद्धी गर्गनेही असेच काहीसे केले आहे. सिद्धी आयटी इंजिनिअर आहे. तिने नोकरी सोडली आणि कुर्ता व्यवसाय सुरू केला. ती ‘कुर्ता घर’ या ब्रँडचे कुर्ते विकते. आज तिची वार्षिक उलाढाल लाखो रुपयांची आहे. तिने बनवलेल्या कुर्त्यांना खूप मागणी आहे.

सिद्धीचा व्यवसाय काय आहे?

सिद्धी हाताने बनवलेले कुर्ते विकते. तिच्या कुर्त्याची खासियत म्हणजे त्यात वापरलेली गोटा पट्टी. याला गोल्डन मेटल रिबन वर्क असेही म्हणतात. राजस्थानच्या शाही दरबारातून गोल्डन मेटल रिबन वर्क म्हणजेच गोटा पट्टीची सुरुवात झाली. आजकाल गोटापट्टी पारंपरिक भारतीय कपड्यांमध्ये, विशेषतः लेहेंगा, साडी आणि कुर्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

या व्यवसायाची कल्पना कशी सुचली?

‘कुर्ता घर’ची सुरुवातही एका अनोख्या पद्धतीने झाली. सिद्धी म्हणते, ‘मी जेव्हा स्थानिक बाजारात गेले तेव्हा मला अनेक एजंट हाताने बनवलेले सामान विकत असल्याचे दिसले. पण, ते खऱ्या किमतीच्या नावाखाली लोकांना लुटत आहेत असे दिसून आले. ग्राहकांना प्रत्येक कापडासाठी १४,००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. मला ते नैतिक वाटले नाही.” २०२२ मध्ये तिने नोकरी सोडली आणि ‘कुर्ता घर’ हे स्टार्टअप सुरू केले. तिच्या स्टार्टअपद्वारे, ती केवळ राजस्थानच्या पारंपरिक तंत्रांचा प्रचार करत नाही तर कमी किमतीत कपडेदेखील पुरवत आहे.

फक्त सात हजार रुपयांपासून सुरुवात

कुर्ता घर सुरू करण्यापूर्वी सिद्धीने सात वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले. नोकरी सोडल्यानंतर सिद्धीने तिच्या बहिणीला तिच्या फायनान्स व्यवसायात मदत केली. काही काळानंतर तिने कुर्ता घर सुरू केले. सिद्धीने फक्त सात हजार रुपयांपासून तिचा व्यवसाय सुरू केला. सिद्धीला या क्षेत्राचा अनुभव नव्हता, पण दृढनिश्चय आणि धैर्याने ती पुढे जात राहिली.

दरमहा २०० ते ३०० ऑर्डर

सिद्धीची स्वतःची वेबसाइट आहे. तिला महिन्याला सुमारे २००-३०० ऑर्डर मिळतात. सिद्धीला देशभरातून ऑर्डर येतात. याशिवाय तिला परदेशातूनही ऑर्डर मिळतात. तिचे ग्राहक कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमधूनदेखील आहेत. सिद्धीचा हेतू केवळ कपडे विकणे नाही तर शतकानुशतके जुन्या हस्तकलांचे जतन आणि प्रचार करणेदेखील आहे. दुकाने आणि ऑनलाइन मार्केटच्या तुलनेत हे कुर्ते खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत.

वार्षिक उलाढाल किती आहे?

सिद्धी तिचा व्यवसाय ऑनलाइन चालवते. तिने देशातील अनेक शहरांमध्ये तिचे कुर्ते विकले आहेत. बरेच लोक तिचे नियमित ग्राहक बनले आहेत आणि भरपूर खरेदी करतात. ती कुर्त्यांमध्ये गोटा पट्टीसोबत जरदोजी आणि मोतीदेखील वापरते. या ब्रँडच्या यादीमध्ये न शिवलेले सूट, साड्या आणि इतर पारंपरिक पोशाखांचा समावेश आहे. यांची किंमत साधारणपणे १९९५ रुपयांपासून सुरू होते. सिद्धीच्या या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न ३० लाख रुपये आहे.

Story img Loader