Success story of Sindhu brothers: हरियाणातील नवीन आणि प्रवीण सिंधू या दोन भावांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. दोघेही स्वतःच्या घरी काश्मिरी केशर पिकवतात. त्यासाठी दोन्ही भावांनी इराण आणि इस्रायलचे प्रगत एरोपोनिक्स तंत्रज्ञान वापरले. त्यामध्ये झाडे मातीशिवाय हवेत वाढतात. या तंत्राने त्यांनी घराच्या गच्चीवर काश्मिरी केशर पिकवून लाखो रुपये कमावले आहेत. केशरला जगातील सर्वांत महाग मसाला, असे म्हटले जाते. चला, नवीन आणि प्रवीण सिंधूच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.
१५x१५ फूट खोलीचे प्रयोगशाळेत रूपांतर
२०१८ मध्ये दोन भावांनी त्यांच्या घराच्या टेरेसवरील १५x१५ फूट खोलीचे एका छोट्या प्रयोगशाळेत रूपांतर केले. येथे त्यांनी एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून केशर पिकवण्यास सुरुवात केली. एरोपोनिक्स हे एक असे तंत्र आहे, ज्यामध्ये झाडे माती किंवा पाण्याशिवाय वाढतात आणि हवेत लटकतात. या सेटअपमध्ये त्यांनी सुमारे सहा लाख रुपयांची गुंतवणूक केली. ज्यात ग्रो लाईट्स, ह्युमिडिफायर, तापमान नियंत्रणासाठी चिलर आणि केशरचे बल्ब ठेवण्यासाठी लाकडी ट्रे यांचा समावेश होता.
अशी आली कल्पना
एम.टेक.चे शिक्षण घेत असताना प्रवीण सिंधूला ही कल्पना सुचली. घरामध्ये केशर पिकवण्याबाबत त्याने वर्तमानपत्रात वाचले होते. त्यावेळी ब्रिटनमध्ये एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या भावाला नवीनला त्याने ही गोष्ट सांगितली. २०१६ मध्ये प्रवीणने शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन्ही भावांनी मिळून हे अनोखे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रवीणने थायलंडला जाऊन कॉर्डिसेप्स मशरूम वाढवण्याचे प्रशिक्षण घेतले. हे मशरूम त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. यादरम्यान नवीन जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे तो केशर लागवड शिकण्यासाठी गेला. पंपोर हे केशर लागवडीचे केंद्र आहे. भारतातील सुमारे ९०% केशर येथे पिकवले जाते. त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांकडून केशर पिकविण्याचे बारकावे शिकून घेतले. त्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठालाही भेट दिली.
सुरुवातीला आलं अपयश
सुरुवातीला प्रवीण आणि नवीन यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी सर्वप्रथम काश्मीरमधून १०० किलो केशराचे बल्ब ऑनलाइन मागवले होते. पण, ते वाईट अवस्थेत पोहोचले. या अपयशातून धडा घेत पुढच्या वर्षी त्यांनी स्वतः पंपोरला जाऊन बल्ब खरेदी केले. २०१९ मध्ये त्यांनी १०० किलो बल्ब खरेदी केले आणि ते केशरचे उत्पादन वाढवण्यात ते यशस्वी झाले. भावांनी हे केशर त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांना भेट म्हणून दिले. त्यातून प्रोत्साहित होऊन, त्यांनी पुढच्या हंगामात थेट ७०० किलो बल्ब खरेदी केले. त्यामुळे त्यांना स्वस्त दरात बल्ब मिळाले. त्या पिकातून त्यांना ५०० ग्रॅम केशर मिळाले, ते त्यांनी अडीच लाख रुपयांना विकले. २०२३ मध्ये त्यांच्या छोट्या प्रयोगशाळेत दोन किलो केशर तयार झाले आणि त्यातून त्यांनी १० लाख रुपये कमावले.
परदेशात केशरची निर्यात
सिंधू ब्रदर्स आता यूएस, यूके आणि देशांतर्गत बाजारात त्यांच्या ‘अमर्त्व’ ब्रॅण्डखाली केशर विकतात आणि निर्यात करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी, ते ऑफ-सीझनमध्ये प्रयोगशाळेत कॉर्डिसेप्स किंवा बटन मशरूम वाढविण्याची योजनेला चालना देत आहेत. ऑगस्टच्या मध्यात प्रयोगशाळेत केशर बल्ब लावले जातात. नोव्हेंबरच्या मध्यात त्यांना फुले येऊ लागतात. ते हाताने फुलांपासून केशराचे धागे वेगळे करतात. कापणीनंतर उरलेल्या फुलांच्या पाकळ्या कॉस्मेटिक कंपन्यांना विकल्या जातात. त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. कापणीनंतर बल्ब पुन्हा जमिनीत लावले जातात, ज्यामुळे त्याचे उत्पादन वाढेल. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा बल्ब खरेदी करण्याची गरज भासत नाही.