Success Story Of Sita Ram Diwan Chand : कोविड-१९ महामारीच्या काळात अनेकांनी व्यवसाय सुरू केले आणि घर चालवण्यासाठी, पोटा-पाण्यासाठी पाककला क्षेत्रात प्रवेश केला. डालगोना कॉफी बनविण्यापासून ते नवीन स्वादिष्ट पदार्थ बनविण्यापर्यंत आणि नेहमीचे पदार्थ स्वतःचा खास टच देऊन कसे बनवायचे हे शिकण्यापर्यंत, अनेक लोकांनी त्यांच्या स्वयंपाकघरांना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये बदलले. तसेच काहींनी लॉकडाऊनचा फायदा घेत, संधीचे सोनेसुद्धा केले. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल, ज्यांना स्वयंपाकाच्या आवडीला योग्य वळण द्यायचे आहे. त्यांनी या व्यक्तीची ‘सक्सेस स्टोरी’ (Success Story) एकदा नक्की वाचावी.

तर, सीता राम आणि त्यांचा मुलगा दिवाण चंद यांनी ‘सीता राम दिवाण चंद’ सुरू करून त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज ती कोट्यवधींच्या साम्राज्यात रूपांतरित झाली आहे. दिल्लीतील ‘सीता राम दिवाण चंद’ हे छोले भटुरेसाठी प्रसिद्ध आहेत. सीता राम यांनी छोले भटुरे बनवून दिल्लीतील लोकांची मने जिंकली आहेत. आज, केवळ दिल्लीतील लोकच नाहीत, तर देशभरातील लोक त्यांनी बनवलेल्या छोले भटुरेचे कौतुक करतात.

१९५५ साली सायकलवरून केली सुरुवात

१९५५ मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. ते पहाडगंज डीएव्ही शाळेसमोर त्यांच्या सायकली पार्क करत असत आणि शाळकरी मुलांना व ये-जा करणाऱ्यांना गरम-गरम छोले भटुरे खायला देत असत. १९७० मध्ये त्यांनी इम्पीरियल सिनेमा मॉलसमोर एक छोटे दुकान उघडले. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आणि त्यांचा व्यवसाय आणखीन वाढला.

‘सीता राम दिवाण चंद’च्या यशाचे रहस्य (Success Story) …

मसाल्यांची वैयक्तिक निवड : ते घरी स्वतःचे मसाले बनवतात.

तोंडाला पाणी सुटेल अशा चटण्या : नैसर्गिकरीत्या गोड आणि आंबट चटण्या डाळिंबाच्या बियांपासून बनवल्या जात असतात.

अनोखे भटुरे : सर्वांत स्वादिष्ट भटुरे बनवण्यासाठी त्यात कॉटेज चीज, कॅरम (carom), मेथी आणि हिंग घालण्यात येते.

छोले रेसिपी : छोले २० हून अधिक मसाल्यांच्या मिश्रणाने बनवले जातात.

व्यवसाय नवीन उंचीवर पोहोचला-

पहाडगंज एक व्यवसाय केंद्र म्हणून वाढू लागला आणि नवी दिल्ली रेल्वेस्थानकाजवळ त्याची जवळीक वाढत गेली, तसतसे अधिकाधिक लोक त्यांच्या व्यवसायाचे कौतुक करू लागले. त्यांच्या जेवणाच्या गुणवत्तेने जुन्या आणि नवीन ग्राहकांना आकर्षित केले. २००८ मध्ये त्यांच्या तिसऱ्या पिढीतील राजीव कोहली, उत्सव कोहली यांनी पितमपुरा, पश्चिम विहार आणि गुरुग्राम येथे छोले भटुरेसाठी नवीन शाखा उघडल्या. त्यामुळे त्यांच्या ब्रँडची वाढ मोठ्या प्रमाणात झाली.

आधुनिकतेकडे एक पाऊल

आजच्या डिजिटल युगात, पुनीत कोहली यांच्या नेतृत्वाखाली सीता राम-दिवाण चंद आता ऑनलाइन बुकिंग आणि डिलिव्हरी सेवांद्वारे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. कोणत्याही मोठ्या व्यवसायाचे यश हे दृढनिश्चय आणि चिकाटीमुळे असते. पण, सीता राम-दिवाण चंद यांच्या यशाचे आणखी एक सूत्र म्हणजे जुन्या पदार्थाची चव टिकवून ठेवणे आणि नवीन पिढीच्या आधुनिक सुविधांचा वापर करून, त्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवणे.

Story img Loader