Sunil Kumar Barnwal Success Story : अनेकांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले असते. पण, आज आपण अशा एका अधिकाऱ्याचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांचा आयएएस अधिकारी होण्याचा प्रवास बालपणापासूनच सुरू झाला. एक हुशार विद्यार्थी असूनही त्यांनी बॅकअप प्लॅन म्हणून अभियांत्रिकी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत, तीन सुवर्णपदके मिळवली आणि नंतर ते गेलमध्ये (GAIL) सामील झाले. काम करताना, त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारीसुद्धा सुरू केली. त्यांनी १९९५ मध्ये प्राथमिक आणि मुख्य परीक्षांसाठी पात्रता मिळवली.
पण, मुलाखतीत उत्तम कामगिरी न करता आल्यामुळे त्यांची निवड होऊ शकली नाही. मग त्यांनी आपली अभ्यास नीती सुधारली. त्यांनी कमकुवतपणावर लक्ष केंद्रित केले आणि स्वतःमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या, ज्यामुळे ते मुलाखतीत १९९६ पैकी एकूण १४१७ गुणांसह यश मिळवू शकले आणि यशस्वी उमेदवारांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. तर, या विद्यार्थ्याचे नाव आहे सुनील कुमार बर्नवाल (Sunil Kumar Barnwal).
यूपीएससी परीक्षेत पटकावले अव्वल स्थान (Success Story) :
सुनील कुमार बर्नवाल हे बिहारमधील आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. ते एका सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील बिहारमध्ये राज्य सरकारी कर्मचारी होते; तर त्यांची आई गृहिणी आहे. सुनील कुमार यांनी भागलपूरमधील बरारी येथील आर.एच.टी.बी. हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षणानंतर इंटरमिजिएट शिक्षणासाठी ते वसतिगृहात राहायला गेले. त्या काळात त्यांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी केली. पण, वयोमर्यादेच्या पात्रतेअभावी ते आयआयटीला बसू शकले नाहीत. त्यांनी आयएसएम धनबाद (ISM Dhanbad), रुरकी अभियांत्रिकी (Roorkee Engineering) व बिहार राज्य अभियांत्रिकी या परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. शेवटी त्यांनी आयएसएम धनबाद येथे पेट्रोलियम अभियांत्रिकी करण्याचा निर्णय घेतला.
आयएएस झाल्यानंतर त्यांनी २०१३ ते २०१४ पर्यंत ली कुआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमधून सार्वजनिक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांच्या कार्यकाळात ते सार्वजनिक धोरण चर्चासत्रांमध्ये सक्रियपणे सहभागी झाले. हा कार्यक्रम शैक्षणिक कठोरता आणि वास्तविक जगाच्या अनुभवाची अद्वितीय जोड देतो, ज्यामध्ये सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठात एक सेमिस्टर, हार्वर्ड विद्यापीठात एक सेमिस्टर व सिंगापूर सरकारच्या मंत्रालयात चार आठवड्यांचा संलग्नता यांचा समावेश आहे.
सुनील कुमार बर्नवाल यांची झारखंडमधील पहिली नियुक्ती ही त्यांच्या सरकारी सेवेतील एक प्रतिष्ठित कारकीर्द आहे. त्यांनी झारखंड सरकारमध्ये विविध पदांवर काम केले. त्यांनी फेब्रुवारी २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत महसूल मंडळाचे अतिरिक्त सदस्य आणि मार्च २०१५ ते डिसेंबर २०१९ पर्यंत सरकारचे सचिव म्हणून काम केले. त्यांनी उद्योग, गुंतवणूक आणि खाणी, खनिज व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले. यापूर्वी त्यांनी जानेवारी २००८ ते ऑगस्ट २००९ पर्यंत महानिरीक्षक (तुरुंग) म्हणून काम केले. झारखंडमध्ये त्यांनी २६ तुरुंगांचे व्यवस्थापन केले आणि सुधारात्मक सेवा व आयटी उपक्रम राबविले. सध्या ते जून २०२३ पासून भारत सरकारमध्ये अतिरिक्त सचिव म्हणून काम करीत आहेत. या भूमिकेपूर्वी त्यांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२३ पर्यंत संयुक्त सचिव पदसुद्धा भूषवले आहे.