Swati Sharma Success Story: राजस्थान सरकारने सोमवारी विविध जिल्ह्यांमध्ये सहायक जिल्हाधिकारी (एसीएम) पदावर १३ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले.

स्वाती तिच्या यशाचे श्रेय यूट्यूब व्हिडीओ आणि कोचिंग इन्स्टिट्यूटना देते, ज्यांच्या मदतीने ती या पदापर्यंत पोहोचू शकली. स्वातीने कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या आधारे यश कसे यश मिळवले ते समजून घेण्यासाठी आपण तिचा प्रवास जाणून घेऊया.

यूपीएससीमध्ये मिळवला १७ वा क्रमांक

जमशेदपूरच्या स्वाती शर्माने यूपीएससी २०२३ च्या परीक्षेत १७ वा क्रमांक मिळवून राज्याचे नाव उंचावले होते. तिने केवळ झारखंडमध्येच अव्वल स्थान मिळवले नाही, तर देशभरात यशाचा झेंडा फडकवला. विशेषतः प्रशासकीय सेवेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी स्वातीचा प्रवास प्रेरणास्रोत ठरला आहे.

लहानपणापासून लष्करी वातावरणात शिक्षणाची वाटचाल

स्वाती शर्मा हिचे वडील संजय शर्मा भारतीय सैन्यात होते. त्यामुळे तिचे बालपण अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले. स्वातीने तिचे सुरुवातीचे शिक्षण कोलकात्याच्या आर्मी स्कूलमध्ये झाले आणि नंतर जमशेदपूरच्या टागोर अकादमीमधून तिने बारावी पूर्ण केली. त्यानंतर तिने जमशेदपूर महिला महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.

यूपीएससीच्या तयारीसाठी यूट्यूब आणि कोचिंग इन्स्टिट्यूटचा आधार

स्वातीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तीनदा प्रयत्न केले. तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. तिने दिल्लीतील करोल बागेत दीड वर्ष तयारी केली. स्वाती प्रामुख्याने स्वतः अभ्यास करायची आणि फक्त मॉक टेस्टसाठी कोचिंग क्लासेसचा आधार घ्यायची. त्याशिवाय YouTube व्हिडीओंनीही तिला तयारीत मदत केली.

यशाचे श्रेय पालकांना

स्वातीला असा विश्वास आहे की, तिच्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि पाठिंबा हे तिच्या यशाचे सर्वांत मोठे कारण आहे. तिला अधिकाधिक महिलांनी नागरी सेवेत प्रवेश करून समाजाची सेवा करावी, अशी इच्छा आहे.

स्वाती शर्माचे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच अभिमानाची गोष्ट नाही, तर सर्व तरुणांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. कठोर परिश्रम आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास कठीण वाटणारी कोणतीही साध्य करता येते हे तिने दाखवून दिले आहे.

बिकानेरमध्ये पहिली नियुक्ती

यूपीएससीमध्ये अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर स्वाती शर्माला राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांदा नियक्ती मिळाली. ही तिची प्रशासकीय सेवेची नवीन सुरुवात आहे, जिथे ती सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी आणि चांगले प्रशासन प्रदान करण्यासाठी काम करणार आहे.