Success Story of Swiggy : आजच्या डिजिटलच्या जगात सर्व काही घरबसल्या मिळते. भाजीपाल्यापासून वस्तूंपर्यंत सर्व काही एका मेसेज किंवा कॉलवर घरी दारावर येतं, त्यासाठी घराबाहेर पडावं लागत नाही. तसेच घरबसल्या जेवण किंवा नाश्ता किंवा कोणताही आवडता गोड किंवा तिखट पदार्थ तुम्ही ऑर्डर करू शकता आणि काही मिनिटांत तुमच्या घरी त्या पदार्थाची डिलिव्हरी होते. एखाद्याला भूक लागली आणि जेवण ऑर्डर करायचं आहे, तर सर्वांत आधी त्याच्या ओठांवर ‘स्विगी करते’, असे शब्द येतात. कारण- स्विगी ही ऑनलाइन फूड सेवा देणारी भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. पण तुम्हाला माहितीये का, स्विगी कंपनी कशी अस्तित्वात आली. खरं तर ‘स्विगी’चा जन्म एका फ्लॉप प्लॅननंतर झाला. आज आपण ‘स्विगी’चा अनोखा प्रवास जाणून घेणार आहोत.
पहिला प्लॅन ठरला फ्लॉप
ही कहाणी आहे दोन मित्रांची. राहुल जॅमिनी आणि श्रीहर्ष मजेटी हे दोन मित्र बिट्स पिलानी संस्थेमध्ये एकत्र शिकले. राहुलने लंडनमध्ये बँकेत नोकरीही केली; पण त्याचे मन तिथे रमत नव्हते म्हणून तो भारतात परतला आणि श्रीहर्षबरोबर मिळून तो बिझनेस सुरू करायाच्या प्लॅन करत होता. दोघांनी यावर खूप विचार केल्यानंतर त्यांनी लॉजिस्टिकचा व्यवसाय सुरू केला.
एक वर्ष उलटले; पण ते कोणताही नफा कमवू शकले नाहीत. शेवटी कंटाळून त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद करण्याचा विचार केला. त्यानंतर पुन्हा त्यांनी मार्केटचा विचार करून, रिसर्च करायला सुरुवात केली की, कोणता असा व्यवसाय निवडावा, जो चांगली कमाई करून देईल. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की फूड डिलीव्हरीचा व्यवसाय चांगला चालू शकतो. हे वर्ष होते २०१४.
तिसऱ्याची एन्ट्री अन् नवी सुरुवात
राहुल आणि श्रीहर्षला मॅनेजमेंटची चांगली जाण होती; पण त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी त्यांचा तिसरा मित्र नंदन रेड्डीला आपल्याबरोबर घेतले, जो कोडिंगमध्ये अव्वल होता. मग काय, या तिघांनी मिळून २०१४ मध्ये बंगळुरूमध्ये स्विगी कंपनी सुरू केली.
कंपनी सुरू केल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांच्याकडे फक्त पाच डिलिव्हरी बॉईज आणि १२ रेस्टॉरंट्स त्यांच्याबरोबर होते पण, एका वर्षामध्ये त्यांना ५०० रेस्टॉरंट्सना त्यांच्याबरोबर जुळवून घेण्यात यश आले.
वर्ष २०१६ हे टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे वर्ष होते. कारण- मार्केटमध्ये फक्त आणि फक्त जिओची चर्चा होती. जिओनं खऱ्या अर्थानं ऑनलाइन मार्केटिंग वाढविण्यास मदत केली. जिओमुळे लोक ऑनलाइन फ्रेंडली झाले आणि याचा फायदा स्विगीला झाला. त्यादरम्यान स्विगीने त्यांच्या कंपनीचे अॅप लाँच केले आणि स्विगीला सोनेरी दिवस आले. त्या दिवसापासून स्विगीने कधीही मागे वळून पाहिले नाही.
स्विगी आज झोमॅटो, फूडपांडा यांसारख्या ऑनलाईन फूड सेवा देणाऱ्या कंपनीला टक्कर देते. स्विगीला मिळालेले यश एका दिवसाचे नाही, तर ते त्यांच्या १० वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. ते आजही ट्रेंड आणि मार्केटच्या मागणीनुसार स्वत:ला अद्ययावत करतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हा सुविचार स्विगीच्या कहाणीला खऱ्या अर्थाने लागू होतो.