Success story of Tea Seller: चहा हे अनेकांसाठी रोजचं पेय असलं तरी महाराष्ट्रातील धाराशिव येथील एक स्थानिक चहा विक्रेता त्याच्या अनोख्या व्यवसाय मॉडेलमुळे सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे. तेर गावातील रहिवासी महादेव नाना माळी यांनी चहा विकण्याची एक वेगळी पद्धत अवलंबली आहे, जी खूप फायदेशीर ठरली आहे.

महादेव माळी गेल्या २० वर्षांपासून चहा विकत आहेत. महादेव माळी यांनी फक्त तिसरीपर्यंत शिक्षण घेतले आहे. फोनवरून ऑर्डर घेण्याच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे त्यांचा व्यवसाय वेगळा आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, माळी त्यांच्या ऑर्डर वेळेवर पोहोचवण्याची खात्री करतात.

चहा विकून कमावतायत लाखो रुपये

परिसरातील सुमारे १५,००० ग्रामस्थांची गरज पूर्ण करण्यासाठी माळी यांना दररोज ५० ते ६० लिटर दुधाची आवश्यकता असते. ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांच्या मदतीने काम करतात आणि दोन ते तीन किलोमीटरच्या परिघात तेर आणि आसपासच्या गावांमध्ये सेवा देतात.

प्रत्येक कप चहाची किंमत फक्त ५ रुपये आहे. माळी हे दररोज १,५०० ते २,००० कप चहा विकतात. या विक्रीतून त्यांचे दररोजचे उत्पन्न सुमारे ७,००० ते १०,००० रुपये आहे. या चांगल्या उत्पन्नातून माळी त्यांचे घर चालवू शकतात आणि चांगले जीवन जगू शकतात.

लोकांसाठी एक धडा

त्यांच्या कमाईतून केवळ त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही तर ते लोकांना धडा देतात की जर कोणी पुरेसे कष्ट केले तर तो चहामधूनही पैसे कमवू शकतो. नाना माळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि त्यांच्या ऑर्डरमधून ते खूप कमाई करतात. त्यांचे कुटुंबही त्यांना यामध्ये साथ देते आणि पैसे कमावून ते आपले घर सुधारत आहेत. त्यांचे दुकान सकाळपासून संध्याकाळपर्यंत उघडे असते आणि लोक तिथे गर्दी करतात.