Utham Gowda Success Story: उथम गौडा यांनी २०१९ मध्ये ‘कॅप्टन फ्रेश’ची स्थापना केली. बेंगळुरूस्थित या कंपनीने सीफूडच्या जगात खळबळ निर्माण केली आहे. ही कंपनी मासे आणि सीफूड यांसारखी प्रथिनयुक्त उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून दुकानांमध्ये वितरित करते. उथम गौडा हे आधीपासून सीफूडच्या व्यवसायात होते. हा बाजार अतिशय अव्यवस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथे नेहमी मालाचा तुटवडा असतो. ही समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ‘कॅप्टन फ्रेश’ सुरू केले. स्थापनेपासून अवघ्या काही वर्षांत ती हजारो कोटींची कंपनी बनली आहे. तेव्हा चला, उथम गौडा यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.
मोठ्या पगारावर करत होते काम
उथम गौडा हे ‘कॅप्टन फ्रेश’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी ते नेक्कांती सी फूड्स लिमिटेडमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष होते. त्यांनी तीन कॅपिटलमध्ये सहयोगी उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. काम करताना उत्तम यांना मोठा पगार मिळत होता. त्यांनी एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. सीफूड पुरवठा साखळीत क्रांती घडविण्याच्या उद्देशाने उथम गौडा यांनी नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
पुरवठा साखळी (Supply chain) सुधारण्याचा उद्देश
‘कॅप्टन फ्रेश’ दररोज अंदाजे १०० टन ताजे मासे आणि तीन डझनहून अधिक प्रकारचे सीफूड विकते. कंपनीची ५० पेक्षा जास्त कलेक्शन सेंटर्स आहेत. ते भारतातील किनारी राज्यांमधील २,५०० हून अधिक स्टोअर्सना त्यांची सेवा देतात. कॅप्टन फ्रेशचा मुख्य उद्देश पुरवठा साखळी सुधारणे हा आहे. कंपनी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत ग्राहकांना वस्तू पोहोचवण्याची हमी देते. त्यामुळे विश्वासार्हता वाढते आणि सीफूड खराब होण्याचा धोका कमी होतो.
कंपनीची मजल चार हजार कोटींहून अधिक रकमेवर
एकूणच कंपनीला आतापर्यंत १२.५ दशलक्ष गुंतवणूक मिळाली आहे. या गुंतवणुकीतून कंपनीला आपला व्यवसाय युरोप आणि अमेरिकेतही वाढवायचा आहे. तिला सीफूड पुरवठा साखळी अधिक पारदर्शक बनवायची आहे. या कंपनीची किंमत चार हजार कोटींहून अधिक आहे.
खूप पूर्वी जाणवली संधी
जून २०२१ मध्ये Accel Partners आणि विद्यमान गुंतवणूकदार Matrix Partners India यांच्या नेतृत्वाखालील मालिका A फेरी उथम गौडा यांनी $12 दशलक्ष इतक्या रकमेचे भांडवल जमा केले. त्यात अंकुर कॅपिटल आणि इनक्युबेट फंडाचा अतिरिक्त सहभागही होता. काम करताना या कामात उथम गौडा यांना भरपूर संधी दिसल्या. हा बाजार अतिशय अव्यवस्थित असून, येथे मालाचा तुटवडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.