Success Story Of Varun Baranwal In Marathi : स्वप्न पूर्ण करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. एखादे संकट आल्यावर खचून जायचं की, त्यातून मार्ग काढायचा हे आपल्यावर अवलंबून असते. कारण प्रत्येक मोठ्या यशामागे अथक परिश्रम, मेहनत, परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द महत्त्वाची ठरते. अशीच एक गोष्ट आहे एका आयएएस ऑफिसरची, ज्यांनी गरिबीवर मात करून स्वतःचे स्वप्न पूर्ण केले. या आयएएस ऑफिसरचे नाव आहे वरुण बरनवाल (Success Story Of Varun Baranwal).

वरुण यांचा जन्म महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील लहानशा बोईसर शहरात झाला. त्यांचे वडील तेथे सायकल दुरुस्तीचे एक छोटेसे दुकान चालवायचे, ज्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत असे. अचानक एके दिवशी वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची, लहानशा दुकानाची जबाबदारी त्यांच्यावर आली. वडिलांनंतर त्यांनी दुकान चालवण्यास सुरुवात केली.

वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी शाळा सोडण्याचा विचार केला होता, पण दहावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर आईने वरुण यांना पुढे शिक्षण सुरू ठेवण्यास सांगितले. त्यावेळी वडिलांवर वेळोवेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर वरुण यांनी पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला.

हेही वाचा…Success Story : ना आलिशान गाडी, ना मोबाईलचा वापर; कोटींची संपत्ती असून साधेपणाने जगतात आयुष्य; वाचा रामामूर्ती यांचा प्रवास

यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ३२ वा रँक :

वरुण यांना डॉक्टर व्हायचे होते पण त्यासाठी खूप जास्त खर्च होणार होता, म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग करण्याचे ठरवले (Success Story Of Varun Baranwal ). त्यांनी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाची फी भरली आणि फर्स्ट इयरमध्ये टॉप केल्याने वरुण यांना स्कॉलरशिप मिळाली. तरीही, त्यांच्या मनात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा देण्याची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. अभ्यासासाठी आवश्यक असलेली पुस्तके, अभ्यासाचे साहित्य आणि इतर अनेक गोष्टी त्यांना एनजीओकडून मिळाल्या.

वरुण यांना मार्गदर्शनासाठी फक्त त्यांच्या जिद्द, जुन्या नोट्सवर अवलंबून राहावे लागले; कारण त्यांच्या मर्यादित बजेटमुळे त्यांना योग्य प्रशिक्षण घेणे परवडत नव्हते. पण, अखेर वरुण यांना त्यांच्या निष्ठावान समर्पणाचे उत्तम बक्षीस मिळाले. त्यांना यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ३२ वा रँक मिळाला. वरुण देशाची सेवा आणि इतर अनेकांना प्रेरणा देत आयएएस अधिकारी म्हणून काम करत आहेत. सायकल मेकॅनिक होण्यापासून, वडिलांच्या अकाली निधनानंतर कष्टाने कमावलेली कमाई कुटुंबाला पाठवून आयएएस अधिकारी बनण्यापर्यंत त्यांची गोष्ट (Success Story Of Varun Baranwal) आता अनेकांना आर्थिक संकट आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही पुढे जाण्यासाठी प्रेरित करते आहे.