Success Story: अनेकांना आयुष्यात खूप मोठं काहीतरी करण्याची खूप इच्छा असते. प्रगतीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी परिस्थितीऐवजी केवळ त्या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि स्वप्न साकारण्याची जिद्द महत्त्वाची असते. भारतामध्ये असे अनेक उद्योजक आहेत की, जे गरीब परिस्थितीतून मेहनतीच्या जोरावर यशस्वी व्यावसायिक झाले आहेत. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यावसायिकाची प्रेरणादायी यशोगाथा तुम्हाला सांगणार आहोत.

या यशस्वी व्यावसायिकाचे नाव मुस्तफा पीसी असून, त्यांनी स्वबळावर ५०० कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे. पण, एकेकाळी मुस्तफा यांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. त्याशिवाय लहानपणी त्यांना शिक्षणातही फारसा रस नव्हता. त्यामुळे ते सहावीत अनुत्तीर्ण झाले होते. मुस्तफा यांचा जन्म केरळमधील वायनाड या छोट्याशा गावात झाला. मुस्तफा यांचे वडील अहमद रोजंदारी मजूर म्हणून काम करीत होते. शिक्षणात रस नसल्याने सहावीत नापास झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली. पण, शाळेतील एका शिक्षकाने मुस्तफा यांना समजावले आणि त्यांना पुन्हा शाळेत येण्यास भाग पाडले. मग मुस्तफा यांनी मनापासून अभ्यास केला आणि पुढचे शिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये काम केले आणि नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न तब्बल ५०० कोटी रुपयांची आहे.

व्यवसायाला अशी झाली सुरुवात

या व्यवसायाची कल्पना सुचली तेव्हा त्यांच्या चुलतभावाने एका विक्रेत्याला साध्या पाउचमध्ये इडली-डोशाचे पीठ विकताना पाहिले, त्यावेळी उत्पादनाच्या दर्जाबाबत ग्राहकांच्या तक्रारी होत्या. मुस्तफा यांच्या चुलतभावाने त्यांना ‘क्वालिटी बॅटर’ बनविण्याची कल्पना सांगितली आणि त्यानंतर आयडी फ्रेश फूड ही कंपनी सुरू झाली. नोकरी करीत ते हा व्यवसाय करू लागले २००५ मध्ये ५०,००० रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे ही कंपनी सुरू केली आणि याची पूर्ण जबाबदारी त्यांनी चुलतभावांवर सोपवली. त्यांनी ग्राइंडर, मिक्सर व वजनाचा काटा घेऊन, ५० स्क्वेअर फुटांच्या स्वयंपाकघरात सुरुवात केली. याबाबत एका मुलाखतीत मुस्तफा यांनी सांगितले होते, “दिवसाला १०० पॅकेट्स विकायला आम्हाला नऊ महिन्यांहून अधिक काळ लागला. या काळात आपण अनेक चुका केल्या आणि त्यातून अनेक गोष्टी शिकलो.”

मुस्तफा यांनी सांगितले, “तीन वर्षांनंतर आमच्या कंपनीला माझी पूर्णवेळ गरज असल्याचे मला जाणवले.” त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि सर्व बचत कंपनीत गुंतवली. मुस्तफा यांच्या कंपनीने अनेक वर्षे संघर्ष केला. या काळात कंपनीचे मोठे नुकसानही झाले. बऱ्याचदा कंपनी कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्याही स्थितीत नव्हती. याबाबत मुस्तफा म्हणाले, “त्यावेळी आम्ही आमच्या २५ कर्मचाऱ्यांना वचन दिले होते की, एक दिवस आम्ही त्यांना करोडपती बनवू. शेवटी जवळपास अनेक वर्षांच्या संघर्षानंतर कंपनीला एक गुंतवणूकदार मिळाला आणि आम्ही आमचे वचन पूर्ण केले.”

हेही वाचा: Success Story: फक्त १० वीपर्यंत शिक्षण; १५०० रुपये महिना पगारात करायचा नोकरी, पण आता आहे ३६ कोटींचा मालक

आज मुस्तफा यांची ही कंपनी सहा प्रकारचे तयार पीठ आणि पराठा उत्पादन युनिट चालवत आहे. त्यापैकी एक युनिट यूएईमध्येदेखील आहे. कंपनी दिवसाला २.५ लाख किलो पीठ आणि ५२,००० किलो कणीक बनवते. त्यामध्ये ४४ लाख इडल्या आणि नऊ लाख मालाबार पराठे बनविले जातात. कंपनी ४५ शहरांमध्ये पसरलेल्या ई-कॉमर्स आणि ३५,००० ऑफलाइन रिटेल भागीदारांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचते. २०२३ मध्ये कंपनीचे वार्षिक उत्पन्न ५०० कोटी रुपये होते.