Success Story: आज आम्ही अशा एका यशस्वी उद्योजकाबद्दल सांगणार आहोत, ज्याचा मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा प्रवास अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ पैसाच नाही तर चिकाटी आणि मेहनतही खूप गरजेची आहे, हे या उद्योजकाच्या यशोगाथेतून शिकायला मिळते.

राजस्थानमधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले विनोद सराफ हे लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. अभ्यासात सातत्याने उज्वल यश मिळवून वयाच्या १७ व्या वर्षी ते राज्यात टॉपर बनले. तसेच वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी BITS पिलानीमधून MBA मध्ये सुवर्णपदक मिळवले. परंतु, अभ्यासात हुशार असूनही विनोद सराफ यांना त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांना त्यांच्या हिंदी भाषिक पार्श्वभूमीमुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे कठीण झाले, मात्र यामुळे ते खचले नाहीत. त्यांनी जवळपास अनेक वर्ष विविध कापड कंपन्यांमध्ये काम केले, जिथे त्यांनी लाखमोलाचा व्यावसायिक अनुभव घेतला.

आदित्य बिर्ला यांचे मिळाले मार्गदर्शन

अखेर विनोद सराफ यांच्या चिकाटीला बिर्ला ग्रुपमध्ये महत्त्वाची भूमिका मिळाली. उद्योगपती आदित्य बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सराफ मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक झाले. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीत एक टर्निंग पॉइंट ठरली आणि सराफ यांनी ग्रासिम इंडस्ट्रीज, मॉडर्न सिंटेक्स आणि भिलवाडा ग्रुप यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले. कालांतराने त्यांनी कॉर्पोरेट जगतात प्रवेश केला आणि अखेरीस सीईओच्या पदापर्यंत पोहोचले.

हेही वाचा: Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! सरकारी नोकरी सोडून उभे केले करोडोंचे साम्राज्य, संत कुमार चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास

१९९० पासून व्यवसायाला सुरुवात

विनोद सराफ यांनी १९९० मध्ये एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले. कॉर्पोरेटमधील मोठ्या पदावरची चांगली नोकरी सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी विनती ऑरगॅनिक्स ही कंपनी स्थापन केली, हे नाव त्यांच्या मुलीच्या नावावरून ठेवले होते. हळूहळू विनोद सराफ यांच्या विनती ऑरगॅनिक्सने उद्योजकीय क्षेत्रात चांगली प्रगती केली. आता विनोद यांची मुलगी विनती सराफ मुत्रेजा यांच्या नेतृत्वाखालील कंपनी, अंदाजे २०,०१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला आणि आनंद महिंद्रा यांसारख्या व्यावसायिक दिग्गजांसह सराफ यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे रु. १५,००० कोटी (USD १.८ बिलियन) असल्याचा अंदाज आहे.

विनोद सराफ यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना २०१९ च्या HURUN इंडिया सेल्फमेड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या ७१ व्या वर्षी ते भारताच्या व्यावसायिक जगतात एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून कायम आहेत. तसेच २०२२ च्या फोर्ब्सच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव ९६ व्या क्रमांकवर होते आणि २०२३ च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत ते १६४७ व्या क्रमांकावर होते.