Success Story: आयुष्यात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. पण, यश मिळवण्याचा मार्ग प्रत्येकासाठी सोप्पा नसतो. असे अनेक लोक आहेत, ज्यांनी त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर परिस्थितीवर मात करून समाजात आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे नाव मोठे केले आहे. देशभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांचे कठोर परिश्रम आणि कामाबद्दलची जिद्द अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत.

आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या व्यक्तीचे नाव प्यारे खान असून ही व्यक्ती एकेकाळी रेल्वेस्थानकाबाहेर गाडीवर संत्री विकायची, ऑटो रिक्षा चालवायची, पण आता त्याची ६०० कोटी रुपयांची उलाढाल असलेली वाहतूक कंपनी आहे.

नागपूर रेल्वेस्थानकाबाहेर विकायचा संत्री

अश्मी रोड ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक आणि एक व्यावसायिक प्यारे लाल खान यांची आई रायसा खातून यांनी प्यारे खान त्यांचे दोन भाऊ, एक बहीण (एकूण चार जणांना) लहान-मोठी कामं करून लहानाचे मोठे केले. हे बहीण-भाऊ मोठे झाल्यावर नागपूर रेल्वेस्थानकाबाहेर संत्री विकून घरखर्च चालवायचे. त्यानंतर प्यारे खान यांनी ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर एका कुरिअर कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम केले. पण, त्यांना वयाच्या १८ व्या वर्षी ओडिशामध्ये झालेल्या अपघातामुळे नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्यांनी एक ऑटो-रिक्षा खरेदी केली आणि घराचा खर्च भागवण्यासाठी ती वापरली.

प्यारे खान यांना ट्रक खरेदी करण्याच्या योजनेतून यश मिळाले. ते बराच काळ नागपूरच्या मेलोडी मेकर्स ग्रुपचा भाग होते, जिथे ते त्या काळात कीबोर्ड वाद्य वाजवत होते. मग त्यांनी ग्रुपला कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी बस खरेदी करण्याची योजना आखली. बस खरेदी करण्यासाठी त्यांनी काही वाद्ये आणि इतर मौल्यवान वस्तू विकल्या, पण यात त्यांना यश मिळाले नाही. यानंतर त्यांनी २००४ मध्ये ट्रक खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण, पैशांच्या कमतरतेमुळे आणि वयाच्या २४ व्या वर्षी बँकेचे कर्ज मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.

इथून सुरू झाला यशाचा प्रवास

नागपूरच्या आयएनजी वैश्य बँकेच्या व्यवस्थापकाकडून ट्रक खरेदी करण्यासाठी ११ लाख रुपये मंजूर झाले. त्यांनी हे कर्ज नियोजित वेळेच्या किमान दोन वर्षे आधी बँकेला परत केले. येथून त्यांच्या नशिबाला इतकी गती मिळाली की त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. २००५ ते २००७ पर्यंत त्यांनी त्यांच्या ट्रकचा ताफा १२ ट्रकपर्यंत वाढवला. ते अशा ठिकाणी काम करायचे, जिथे इतर लोक काम करायला घाबरायचे. त्यांनी जोखीम घेतली आणि मोठ्या गटांबरोबर काम केले. २०१९ मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचा व्यवसाय १२५ ट्रकपर्यंत वाढला.

६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल

सध्या त्यांच्या कंपनीशी ३००० हून अधिक ट्रक जोडलेले आहेत आणि त्यांचा व्यवसाय ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे. त्यांच्या कंपनीत एकूण ७०० हून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांची कंपनी, अश्मी रोड ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, भारत आणि परदेशात स्टील आणि वीज पायाभूत सुविधांची वाहतूक करण्यासाठी दररोज ३,००० हून अधिक ट्रक भाड्याने घेते. कंपनीची देशभरात १० कार्यालये आहेत. खान यांची कंपनी आज केईसी इंटरनॅशनल, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा आणि सेल यांसारख्या कंपन्यांना डिलिव्हरी करते.