Success Story: भारतातील असंख्य मुले-मुली दरवर्षी अनेक स्पर्धा परीक्षा देतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. आयुष्यातील अनेक संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करीत, अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. पण, बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण तरीही खचून न जाता, काही जण परीक्षा उत्तीर्ण करतात. बिहारमधील राहुल कुमार यांनी बीपीएससीच्या परीक्षेत ६७ वा क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाचा प्रवास त्यांच्यासारख्या गरीब परिस्थितीशी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
राहुल कुमार हे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील कर्मा भगवान या गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील रवींद्र ठाकूर आधी सलून चालवायचे; पण लॉकडाऊनच्या काळात ते सलून बंद पडले. त्यामुळे त्यांच्या वडिलांना दुसऱ्याच्या सलूनमध्ये काम करावे लागले. आर्थिक अडचणी असूनही वडिलांनी राहुल यांना अभ्यासासाठी प्रेरित केले. राहुल यांनी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे, असे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते. पहिल्या तीन प्रयत्नांत त्यांना अपयश आले; परंतु जिद्द कायम ठेवून आणि मेहनत करून राहुल यांनी चौथ्या प्रयत्नात बीपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवले.
सरकारी शाळेत शिक्षण
राहुल यांनी सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून घेतले होते. त्यानंतर त्यांनी सच्चिदानंद सिन्हा कॉलेजमधून इंटरमिजिएट सायन्स केले आणि भूगोल विषयात पदवी घेतली. पदवीनंतर राहुल यांनी अधिकारी होण्याचे लक्ष्य ठेवले आणि मेहनतीने त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. मात्र, या अभ्यासाच्या कोचिंगसाठी राहुल यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बीपीएससीची तयारी केली. गरीब परिस्थितीमुळे त्यांच्याकडे महागडी पुस्तके किंवा कोचिंगची सोय नव्हती; पण इंटरनेटचा योग्य तो वापर करून त्यांनी अभ्यास केला आणि चौथ्या प्रयत्नात यश मिळवून अग्रगण्य १०० मध्ये स्थान मिळवून दाखविले.
मुलाखतीला जाण्यासाठी नव्हते कपडे
राहुल यांचा संघर्ष इथेच संपला नाही. जेव्हा त्यांना बीपीएससीच्या मुलाखतीसाठी जायचे होते तेव्हा त्यांच्याकडे चांगले कपडे नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या गावातील मधुसूदन ठाकूर यांच्याकडून कर्ज घेऊन कोट-पँट शिवून घेतली आणि चांगले कपडे घालून ते मुलाखतीला गेले. राहुल यांची ही कहाणी त्या सर्व लोकांसाठी प्रेरणादायी आहे; जे गरीब परिस्थितीवर मात करून यश मिळविण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत.