Success Story: भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश मिळते; तर काहींना खूप मेहनत घ्यावी लागते. आजपर्यंत आम्ही तुम्हाला अशा अनेक विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगितले आहे. आज पुन्हा एका यशस्वी तरुणाच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. या तरुणाचा प्रवास नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बेलौन या छोट्याशा गावातल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या राकेश झा या तरुणाचे सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही त्याने अभ्यास करण्यात माघार घेतली नाही. त्याच्या सहावी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च गावातील शिक्षक मनोज झा यांनी उचलला. राकेशने भागलपूरच्या मारवाडी कॉलेजमधून बारावी आणि बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. या काळात पंकज टंडनसरांनी त्यांना सीए होण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले.
मित्रांकडून पावलोपावली मदत
बारावीनंतर राकेश पहिल्याच प्रयत्नात सीपीटी परीक्षा उत्तीर्ण करून दिल्लीला पोहोचला. इथे त्याने आर्टिकलशिप आणि सीए फायनलची तयारी केली. या काळात त्याला कुटुंबीयांची साथ मिळाली नाही आणि त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला प्रत्येक पावलावर साथ दिली. कधी रूमचे भाडे भरण्यात, तर कधी उदरनिर्वाहासाठी राकेशच्या मित्रांनी त्याला मदत केली. त्याच्या सीए अंतिम परीक्षेचे शुल्कही त्यांनी भरले होते. या पाठिंब्यामुळे राकेशला आर्थिक चणचण असतानाही त्याची स्वप्ने पूर्ण करण्यास हातभार लागला.
कुटुंबीयांचीही साथ
राकेशच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती जरी कमकुवत असली तरी त्यांनी त्याला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिले. त्याची बहीण आणि भावजय यांनीही त्याला सर्वतोपरी साथ दिली. एक मुलाखतीत राकेशने संगितले होते की, त्याच्या कुटुंबाचा विश्वास आणि त्याच्या मित्रांची मदत ही त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे.