Success Story: भारतात असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ खूप खडतर होता. त्या व्यक्तींना त्यांचे बालपणही गरिबीत घालवावे लागले, अनेक गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागले. परंतु, केलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत. मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य केले. आज अशाच एका भारतीय व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या व्यक्तीचे नाव आज फोर्ब्स मिडल इस्टच्या ‘UAE मधील शीर्ष १०० भारतीय नेत्यांच्या’ यादीत १२ व्या क्रमांकावर आहे.

ही गोष्ट रिझवान साजन यांची आहे, ज्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या साजन यांना लहानपणापासूनच संकटांचा सामना करावा लागला. १६ व्या वर्षी वडील गमावल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विविध नोकऱ्या स्वीकारल्या. दूध वितरीत करण्यापासून पुस्तके आणि फटाके विकण्यापर्यंत, साजन यांची सुरुवातीची वर्षे आव्हानांनी भरलेली होती.

१९८१ मध्ये साजन चांगल्या संधीच्या शोधात कुवेतला गेले. तिथे त्यांनी त्यांच्या काकांच्या बिल्डिंग सप्लाय स्टोअरमध्ये एक प्रशिक्षणार्थी सेल्समन म्हणून सुरुवात केली, जिथे त्यांनी मौल्यवान उद्योग अनुभव मिळवला. परंतु, १९९१ मध्ये जेव्हा आखाती युद्धामुळे त्यांना मुंबईला परतावे लागले, तेव्हा या घटनेनंतर खचून न जाता १९९३ मध्ये साजन दुबईला गेले. तिथे त्यांनी हार्डवेअरच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Success Story : दरमहा ४०० रुपये पगाराच्या नोकरीपासून ते दोन हजार कोटींचा व्यवसाय उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

परंतु, त्यानंतर त्यांनी काही हजारांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. साजन यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली डॅन्यूब या नावाचा छोटा व्यवसाय झपाट्याने वाढला. आज, डॅन्यूब वार्षिक कमाईत एईडी ५ अब्जपेक्षा जास्त उत्पन्न करते आणि आखाती, आशिया आणि आफ्रिकेत लक्षणीय उपस्थिती आहे. कंपनी बहारीन, ओमान, सौदी अरेबिया, कतार, भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये कार्यरत आहे. साजन यांचे योगदान व्यवसायापलीकडेही आहे. सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी डॅन्यूब वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली आणि प्रतिष्ठित मोहम्मद बिन रशीद अल मकतूम बिझनेस एक्सलन्स अवॉर्डने त्यांना ओळखले गेले.

आता अंदाजे यूएसडी २.५ अब्ज म्हणजेच २०,७५० कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह, रिझवान साजन यांचा प्रवास जगभरातील अनेक उद्योजकांसाठी एक प्रेरणा आहे.

Story img Loader